हरवलेला नातू सुखरूप परतल्याने कांबेत जल्लोष pudhari photo
ठाणे

Missing child found : हरवलेला नातू सुखरूप परतल्याने कांबेत जल्लोष

आजी-आजोबांच्या घरी ‘दिवाळी आधीच दिवाळी’!

पुढारी वृत्तसेवा

टिटवाळा : दारिद्य्र, गळकी छप्परे आणि तुटलेल्या भिंतींमध्ये जगणार्‍या कांबा गावातील एका वयोवृद्ध दाम्पत्याच्या आयुष्यात अचानक अंधार दाटून आला होता. कारण त्यांच्या जिव्हाळ्याच्या नातवाचा गेल्या काही दिवसांपासून काहीच पत्ता नव्हता. परंतु गावातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे तो सुखरूप सापडला आणि त्या वृद्ध दाम्पत्याच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश फुलला. त्यामुळेच या घरात दिवाळी आधीच उजळल्याचे दृश्य पाहून संपूर्ण गावाचे डोळे पाणावले.

कल्याण तालुक्यातील कांबा गावात राहणारे तिमाप्पा आणि मौनाम्मा मालपोल हे वयोवृद्ध दाम्पत्य आपल्या नातवाच्या जीवावरच आयुष्याचा आधार समजून जगत होते. मात्र काही दिवसांपूर्वी तो अचानक बेपत्ता झाल्याने त्यांच्या संसारावर दु:खाचे सावट पसरले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या, आणि घरातील शांततेत केवळ आर्त हाका घुमत होत्या.

या घटनेची माहिती मिळताच गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक शेळके यांनी ती संजय कांबळे यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यांनी तातडीने म्हारळ पोलीस चौकीतील अधिकारी जाधव यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती करूल सर्वत्र शोधमोहीम सुरू केली. या सर्व प्रयत्नांना अखेर यश आले आणि या आजी आजोबांचा नातू सुखरूप अवस्थेत सापडला! ही बातमी गावात येताच आनंदाला उधाण आले.

नातू घरी परतल्यावर आजीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. “आमच्या घरात पुन्हा प्रकाश आला, देव आणि सर्वांनी केलेल्या मदतीबद्दल आम्ही ऋणी आहोत,” असे त्यांनी भावनाविवश होत सांगितले.

कांबळे यांनी सांगितले की, “ हा मुलगा चांगला पेंटर आहे. त्याला भविष्यात एक नामांकित कला महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.” या घटनेबाबत समाजसेवक हिरामण खरखर म्हणाले, “मुलगा सुखरूप परत आल्याने सर्वांच्या चेहर्‍यावर पुन्हा हास्य फुलले आहे. यंदाची दिवाळी आम्ही त्याच्यासोबत साजरी करणार आहोत, कारण हेच आमचं खरं सणाचं कारण आहे.”

माणुसकीची ताकद

कांबा गावातील या घटनेने पुन्हा एकदा माणुसकीची आणि एकतेची ताकद दाखवून दिली. निराधार वृद्धांच्या घरात परतलेला नातू म्हणजेच त्यांच्यासाठी आशेचा किरण असून त्याच्या परतण्यामुळे कांबा गाव यंदा दिवाळी आधीच उजळले! असे म्हणावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT