डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडे मुरबाड रोड परिसरात राहणार्या एका 73 वर्षीय वृध्द व्यावसायिकाला वाढीव नफ्याचे अमिष दाखवून शेअरमध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास भाग पाडून दोन महिलांनी 61 लाख 90 हजार रूपयांची फसवणूक केली आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत फसवणुकीचा प्रकार घडला आहे.
दिनेश जगजीवन शहा (73) असे फसवणूक झालेल्या वृध्द व्यावसायिकाचे नाव असून ते कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोड परिसरात राहतात. दिनेश यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. त्यांनी नेहा पटेल आणि तृप्ती गोहर या दोन महिलांच्या विरूध्द महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या दोन्ही महिलांचे तक्रारीत दाखल करण्यात आलेले मोबाईल क्रमांक बंद येत आहेत.
पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार दिनेश शहा यांच्याशी एप्रिल महिन्यात दोन महिलांंनी व्हॉट्स पवरून संपर्क साधला. त्या महिलांनी दिनेश यांना एसीआय इन्व्हेस्टमेंट नामक व्हॉट्स प गुप्रमध्ये समाविष्ट केले. या ग्रुपच्या माध्यमातून त्या महिला शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास कसा वाढीव नफा मिळतो? याचे सल्ले देऊ लागल्या.
या ग्रुपमध्ये अनेक गुंतवणूक सदस्य होते. शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास वाढीव नफा मिळेल, असे अमिष एसीआय इन्व्हेस्टमेंटने व्हॉट्स अॅप ग्रुपच्या माध्यमातून नेहा पटेल आणि तृप्ती गोहर या दोघींनी दिले. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार तक्रारदार दिनेश शहा यांनी दिलेल्या विविध बँक खात्यावर टप्प्याने एप्रिल ते जून या कालावधीत एकूण 61 लाख 90 हजार रूपयांची गुंतवणूक ऑनलाईनद्वारे केली.
दिलेल्या निर्धारित वेळेनुसार दिनेश शहा यांनी त्या दोन्ही महिलांकडे वाढीव नफा देण्याची मागणी केली. मात्र वेगवेगळी कारणे सांगून रक्कम काढण्यास मज्जाव करण्यात आला. मूळ रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता दिनेश यांना अडथळे आणले गेले.
सतत मागणी करूनही त्या दोन्ही महिला वाढीव नफा नाहीच, पण मूळ रक्कम परत करत नव्हत्या. त्या नंतर दोघींनी संपर्काला प्रतिसाद देणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर दिनेश शहा यांनी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलिस निरीक्षक नांगरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
कल्याण-डोंंबिवली परिसरात ज्येष्ठ, वृध्द महिला, पुरूष यांंना लक्ष्य करून कथित गुंतवणूक सल्लागार ऑनलाईनद्वारे आर्थिक फसवणूक करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून हे प्रकार वाढू लागले आहेत. विशेष करून मध्यमवर्गियांची वस्ती असलेल्या भागातील रहिवाशांंना हे बदमाश गुंतवणूक सल्लागार असल्याचे सांगून सर्वाधिक लक्ष्य करत आहेत. अशा बोगस गुंतवणूकदारांच्या अमिषाला कुणीही बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.