भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने 20 कंत्राटी कर्मचार्यांना अचानक कामावरून काढून टाकले. त्याच्या निषेधार्थ कर्मचार्यांनी श्रमजीवी कामगार संघटनेच्या माध्यमातून विभागाचे सहाय्यक आयुक्त नरेंद्र चव्हाण यांच्या दालनात शुक्रवारी ठिय्या आंदोलन छेडले.
पालिकेने अतिक्रमण विभागात कंत्राटी पद्धतीवर कर्मचार्यांची नियुक्ती करण्याच्या आनुषंगाने दोन ठेकेदारांना नव्याने ठेका दिला. यातील एका ठेकेदाराने यापूर्वी विभागात कंत्राटी पद्धतीवर काम करणार्या कर्मचार्यांची सेवा कायम ठेवली तर दुसर्या ठेकेदाराने आपल्या ठेक्यात समाविष्ट असलेल्या 20 कंत्राटी कर्मचार्यांना कामावरून काढून टाकले. तत्पूर्वी कर्मचार्यांना कोणतीही नोटीस देण्यात आली नाही. तसेच त्यांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. यामुळे संतप्त कर्मचार्यांनी श्रमजीवी कामगार संघटनेच्या माध्यमातून अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त नरेंद्र चव्हाण यांच्या दालनात शुक्रवारी ठिय्या आंदोलन छेडले.
याविरोधात सहाय्यक आयुक्तांनी भाईंदर पोलीस ठाण्यात कर्मचार्यांविरोधात तक्रार करीत त्यांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप केला. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर कर्मचार्यांनी आपली बाजू मांडून सहाय्यक आयुक्तांनी खोटे आरोप केल्याचे पोलिसांना सांगितले. यानंतर कर्मचार्यांनी उपायुक्त कल्पिता पिंपळे यांच्याकडे धाव घेत त्या कर्मचार्यांना पुन्हा कामावर घेण्याची मागणी केली. उपायुक्तांनी मालक रमेश मंडेल यांना पाचारण केले. त्यावेळी ठेकेदाराने या कर्मचार्यांना प्रशासनानेच कामावरून कमी करण्याचे आदेश दिल्याचा दावा केला.
तर उपायुक्तांनी तसा कोणताही आदेश ठेकेदाराला देण्यात आला नसून कोणत्या कर्मचार्याला कामावर ठेवायचे, हा अधिकार मात्र ठेकेदाराचा असल्याचे स्पष्ट केले. यावर समाधान न झालेल्या कर्मचार्यांनी पुन्हा कामावर घेण्याचा रेटा सुरूच ठेवला. अन्यथा श्रमजीवी संघटनेचे सर्व कामगार आंदोलन छेडतील, असा इशारा दिला.
यावर नमते घेत ठेकेदाराने त्या कर्मचार्यांना पुन्हा कामावर घेण्याचे मान्य केले. मात्र या सर्व कर्मचार्यांना कामावर रुजू होण्यापूर्वी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास ठेकेदाराकडून सांगण्यात आले. आंदोलक कामगारांचे नेतृत्व श्रमजीवी कामगार संघटनेचे मिरा-भाईंदर शहर अध्यक्ष मंगेश मोरे यांनी केले. तर आंदोलनात संघटनेचे जयश्री पाटील, मंगेश पाटील यांच्यासह कर्मचार्यांनी सहभाग घेतला होता.