सोलापूर : मौजमजेसाठी दोन अल्पवयीन मुलांनी पाच लाख रुपयांची चोरी केली, परंतु मोटारसायकल खरेदी करण्यासाठी आले आणि जेलरोड पोलिसांच्या हाती लागले.
दोन अल्पवयीन मुले मोटारसायकल खरेदी करण्यासाठी पद्मशाली चौक येथे येणार असल्याची माहिती जेलरोड पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
अधिक चौकशी केली असता त्यांनी रविवार पेठ येथील उघड्या घरातून तब्बल पाच लाख रुपयांची रोकड चोरल्याची कबुली दिली. त्यातील चार लाख दहा हजार रुपये जप्त करण्यात आले. उरलेले पैसे मुलांनी मौजमजेसाठी खर्च केले. त्यांनी अजून कोणते गुन्हे केले आहेत का, याची चौकशी सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत, भाऊसाहेब बिराजदार, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, शरीफ शेख, गजानन किणगिरी, एम.बी. नदाफ, वसंत माने, धनाजी बाबर, अब्दुल शेख, भारत गायकवाड, संतोष वायदंडे यांनी पार पाडली.