सोलापूर : विविध टेंडर मिळवून देतो म्हणून वीस जणांची 13 लाख 49 हजार 500 रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत प्रवीण सोपान भुजाडे (वय 39, रा. देवळाली, नाशिक) याच्या विरोधात फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी सौरभ आबासाहेब पवार (वय 26, रा. भागवत चाळ) याला आरोपीने जानकी फॅब्रिक्स व राधिका सिल्क या दोन कंपनीचे टेंडर मिळवून देतो म्हणून एक लाख 70 हजार 500 रुपये घेतले. नाष्ट्याचे टेंडर देतो म्हणून यशराज किरण लाटणे याच्याकडून चार लाख 96 हजार रुपये तर चंदा सोनु दाबी यांच्याकडून पाच लाख 60 हजार रुपये घेतले.
कंपनीत महिलांना ने-आण करण्यासाठी महिना 15 हजार रुपये देतो म्हणून आयडी बनविण्याकरिता तुकाराम मुंगसे, हरिष कटके यांच्यासह 15 रिक्षाचालकांकडून एक लाख 23 हजार रुपये घेतले. पैसे मागण्यास गेले असता फिर्यादीस शिवीगाळ केली. एकूण 13 लाख 49 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रवीण भुजाडे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.