माळशिरस : येथील ग्रामीण रुग्णालयात 28 पैकी 10 पदे रिक्त आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे अत्यावशक असणार पद गेल्या पाच वर्षापासून रिक्त असल्याने रुग्णाचा तपासणी अहवाल तात्काळ उपलब्द्ध होत नाही. त्यामुळे रोगाचे निदान होऊन उपचार करण्यास विलंब होत असल्याने रुग्णाला धोका होण्याची शक्यता आहे. यामुळे रिक्तपदे तात्काळ भरावीत, अशी मागणी नागरिकातून होत आहे.
माळशिरस ग्रामीण रुग्णालयात प्रत्येक महिन्यात 4 ते पाच हजार रुग्णाची तपासणी केली जाते. गेल्या आठ दिवसापासून तालुक्याच्या विविध भागात कोविड रुग्ण आढळून येत आहेत.येत्या महिनाभरात श्री संत ज्ञानेश्वर व श्रीसंत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा तालुक्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर तालूक्यातील आरोग्य विभाग सतर्क व सर्व उपचार करण्यासाठी सक्षम असणे अत्यावशक आहे. या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक एक्स रे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, परिचारिका 7 पदे, डेंटल, हि पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकारी पदे कंत्राटी पद्धतीने भरली आहेत.
विशेष तज्ञ वैद्यकीय अधिकारी नाहीत. तालुक्यातील दोन्ही पालखी मार्गासह टेंभुर्णी -सातारा हा महा मार्ग झाला आहे. रस्ते चांगले असून रस्त्याच्या अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासाठी तालुक्यात महिला व शिशु हॉस्पिटल, 100 बेडचे रुग्णालय, ट्रामा सेंटर होणे अत्यावशक आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी असलेला ऑक्सिजन प्लान्ट तयार ठेवण्यात आला असून त्याची चाचणीही घेण्यात आली आहे.
माळशिरस तालुक्यात कोविड रुग्णात वाढ होत असून त्या पार्श्वभूमीवर व पालखी सोहळ्यासाठी 5 आय. सी. यू. बेड व 30 इतर बेड तयार ठेवण्यात आले आहेत. कोविड रुग्ण व पालखी सोहळा यासाठी 92 प्रकारची औषधांची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर रिक्त कर्मचार्याच्या पूर्ततेसाठी सतत पाठपुरावा करीत आहोत.- डॉ. मुकुंद जामदार, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय माळशिरस
माळशिरस : कोविड व पालखीच्या पार्श्वभूमीवर पाच आय.सी.ओ. बेड तयार ठेवण्यात आले आहेत. तर दुसर्या छायाचित्रात कोविडसाठी तयार ठेवण्यात आलेला ऑक्सिजन प्लांट.