सोलापूर : नव्याने सुरू करण्यात आलेल्या सोलापूर-मुंबई विमानसेवेमुळे सोलापूर परिसरातील औद्योगिक विकासाला गती मिळेल, पर्यटन क्षेत्राला चालना मिळून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. येत्या काळात सोलापूरला नाईट लँडिंग सुविधा आणि बोईंग विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येतील. त्यातून सोलापूर जगाशी जोडले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सोलापूर-मुंबई विमानसेवेच्या प्रारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होटगी रोडवरील विमानतळावर करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून विमानसेवेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी पांगरी, मोहोळ, कुर्डुवाडी, बार्शी, वैराग या पाच पोलीस ठाण्यांच्या इमारतींचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पूरग्रस्त बाधितांना दिवाळी किटचे वाटपही त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोलापूर येथून मुंबईकडे जाणाऱ्या विमानातील पहिले प्रवासी बसव गायकवाड यांना मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात आला.
सोलापूरचे विमानतळ कार्यान्वित झाल्याने लवकरच सोलापूरला आयटी पार्क उभारण्यात येईल. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. स्वच्छ पाण्यासाठी एक हजार कोटींची निधी सोलापूर शहराच्या विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करत असून जलवितरण वाहिनीसाठी एक हजार कोटीचा निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे शहरात दररोज शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येईल.
अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांना संकटकाळी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे 32 हजार कोटींचे पॅकेज शेतकऱ्यांसाठी देण्यात आले असून दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात मिळतील असा प्रयत्न असून, महिनाभरात ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. असेही फडणवीस यांनी सांगितले.
कार्यक्रमास केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आ. सुभाष देशमुख, आ. विजयकुमार, माजी खा.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ.देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कोल्हापूर परिक्षेत्र आय जी सुनील फुलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, मनपा आयुक्त सचिन ओंबासे, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, स्टार एअरचे संजय घोडावत, एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या सहायक व्यवस्थापक अंजनी कुमारी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सोलापूर विमानतळ प्राधिकरणच्या सहव्यवस्थापक अंजनी शर्मा यांनी केले. सुत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले. उद्योजक संजय घोडावत यांनी आभार मानले.