बार्शी : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर धाराशिव जिल्ह्याच्या बालाघाट पर्वतरांगावर व बार्शी तालुक्याच्या लगतच्या गावामध्ये दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे बार्शी तालुक्यातील चांदणी नदीला पुन्हा पूर आला आहे. तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, चांदणी नदीकाठच्या शेतकर्यांना प्रशासनाने खबरदारीचे आवाहन केले आहे
शनिवारी धाराशिव जिल्ह्यातील कळंब, वाशी, तेरखेडा, येरमाळा या परिसरात मुसळधार पाऊस झाला होता.या दमदार पावसानेे धाराशिव जिल्ह्यातील कडकनाथ वाडी येथील तलाव पूर्ण क्षमतेने भरला. तलावात येणारे पाणी सांडव्याच्या माध्यमातून पूर्णपणे बाहेर पडत असल्याने चांदणी नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहेे. धाराशिव जिल्ह्यातील कडकनाथ वाडी येथे उगमस्थान असलेल्या चांदणी नदीचे पाणी वाशी तालुक्यातून बार्शी तालुक्यातील अनेक गावातून प्रवास करत माढा तालुक्यातून गेलेल्या सीना नदीला जाऊन मिळत. त्यामूळेे सीना नदीच्या पाण्यातही वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.चांदणी नदीकाठावरील बाभुळगाव, आगळगाव, मांडेगाव बेलगाव, देवगाव कांदलगाव खडकल गाव आदी नदीकाठच्या गावातील शेतीला पुन्हा धोका निर्माण झाला आहे.
बार्शी तालुक्याला 26 सप्टेंबर रोजी रेकॉर्ड ब्रेक अशी अतिवृष्टी झाली होती. 27 व 28 सप्टेंबर असे दोन मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन नद्यांना महापूर आले होते. पुन्हा पाऊस येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत असल्यामुळे तालुक्यातील जनतेमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.एकीकडे तालुक्यातील चांदणी भोगावती नागझरी नीलकंठा या नदीपात्रातील व नदी परिसरातील गावांची स्थिती थोडीफार सुधारत असल्याचे जाणवत असतानाच पुन्हा रात्रीपासून तालुक्यालगत मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टीला सुरुवात झाली आहे.
काही गावांचे मार्ग बंद
तालुक्यासह चांदणी नदी क्षेत्राच्या वरील भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. नदीला पाणी आल्यानेे आजही बार्शी ते आगळगाव भूम, देवगाव, खडकलगाव, मांडेगाव आदी गावांचा संपर्क तुटला होता. तालुक्यातील श्रीपतपिंपरी, धामणगाव, मांडेगाव, आगळगाव, बोरगाव ते उपळे, भातांबरे ते पिंपरी, मालेगाव ते वैराग, बोरगाव ते झरेगाव हे मार्ग बंद झाले.