Solapur News: एक लाख खातेदारांचे पैसे अडकले Canva
सोलापूर

Solapur News: एक लाख खातेदारांचे पैसे अडकले

समर्थ बँकेवर रिझर्व्ह बँकेने बंधने घातल्याने खातेदार अस्वस्थ

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापुरातील नावाजलेल्या समर्थ सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने कडक कारवाई करीत बंधने घातली. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. बुधवारी (दि. 8) अनेक शाखांमध्ये खातेदारांनी गर्दी करीत पैशाची मागणी केली. बँक अडचणीत आल्याने एक लाखाहून अधिक खातेदारांचे पैसे अडकले. बार्शीतही खातेदारांनी बॅकेच्या शाखेसमोर गर्दी केली.

रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय समर्थ बँकेला कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. नव्याने कोणालाही कर्ज देता येणार नाही, बचत व चालू खात्यातून रक्कम काढता येणार नाही. कोणतीही मालमत्ता विक्री करता येणार नसल्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. पुढील सहा महिने हे आदेश लागू असणार आहेत. यामुळे समर्थ बँक चांगलीच अडचणी आली आहे. समर्थ बँकेतील एक लाख खातेदारांना याचा फटका बसणार आहे.

समर्थ बँकेच्या राज्यात 32 शाखा आहेत. बँकेच्या ठेवी गेल्या काही वर्षात कमी होऊन 650 कोटींवर आल्या. मोठ्या कर्जदारांकडे 400 कोटींचे कर्ज थकित आहे. बँकेचा एनपीए सव्वाशे कोटींवर आला आहे. चालू खात्यात खातेदारांचे 100 कोटी आहेत तर बचत खात्यातील आकडा समजू शकला नाही.

एवढ्या मोठ्या रकमा अडकून पडल्याने बँकेतून व्यवहार करणारे व्यापारी, बडे खातेदार यांच्यापासून सर्वसामान्य खातेदारांपर्यंत सर्वजण अडचणीत सापडले आहेत. सहा महिन्यासाठी हे निर्बंध आहेत परंतु आम्ही रिझर्व्ह बँकेच्या संपर्कात आहोत. निर्बंध शिथिल करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. अडीचशे कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यातील सव्वाशे कोटी रुपये आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे यांनी दिली.

आदेश येताच सर्व व्यवहार बंद

रिझर्व्ह आदेश येताच बँकेने सर्व व्यवहार बंद केले. एटीएम तसेच ऑनलाईन सुविधा तत्काळ बंद केली. यामुळे खातेदारांचे सर्व व्यवहार बंद पडले. बचत खात्यात असणारी वापरायची किरकोळ रक्कमही अडकून पडली. यामुळे खातेदार प्रचंड संतापले. बुधवारी सकाळ पासून अनेक शाखांमध्ये खातेदारांनी गोंधळ घातला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT