बार्शी : अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने विवाह लावल्याप्रकरणी व त्यानंतर सासरी पतीसह सासू, सासरा व ननंदेकडून मानसिक व शारीरिक छळ करून, गर्भपात केल्याप्रकरणी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आईसह पती, सासू-सासरे व नणंदाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीची आई संगीता मारुती गरड, पती पवन गायकवाड, सासू अलका गायकवाड, सासरे राजकुमार गायकवाड, नणंद कोमल राहुल पौळ अशी या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि. 29 मे 2023 ते 25 जुलै 2024 या कालावधीत ती अल्पवयीन असताना, तिची आई संगीता मारुती गरड हिने जबरदस्तीने तिचा विवाह लावून दिला. विवाहानंतर ती सासरी गेल्यानंतर पतीने ’ती’ अल्पवयीन असल्याची माहिती असूनही वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
जेव्हा त्या अल्पवयीन मुलीने नकार दिला, तेव्हा सासू, सासरे यांनी तिला जबरदस्तीने पतीबरोबर संबंध ठेवण्यास भाग पाडले. तसेच सासरच्या मंडळींनी ‘घरकाम येत नाही, तुला लिहिता-वाचता येत नाही, लग्नात हुंडा, दागिने, भांडी दिली नाहीत. मानपान केला नाही’ असे म्हणून वेळोवेळी मारहाण करून जाचहाट केला. नणंद हिनेही त्रास दिला. गर्भवती राहिल्यानंतर तिच्या पोटातील मूल नको, असे म्हणून मारहाण केल्याने गर्भपात झाला असे तिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे हे करीत आहेत.