सोलापूर : राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी निवडणुका जाहीर केल्या. त्यामुळे जिल्ह्यातील अकरा नगरपालिका व एका नगरपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून, चार लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी 10 नोव्हेबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. 2 डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे. निवडणूक लागलेल्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येकी 20 सदस्यांच्या निवडीकरीता दुधनी, मैंदर्गी, अकलूज, मोहोळ, सांगोला, कुर्डुवाडी, करमाळा, मंगळवेढा या नगरपालिकांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे. अक्कलकोट नगरपरिषदेच्या 25 सदस्यांकरीता, बार्शी नगरपालिकेच्या 42 सदस्यांकरीता, तर पंढरपूर नगरपालिकेच्या 34 सदस्यांच्या निवडीकरीता निवडणूका घेण्यात येत आहे. याशिवाय अनगर नगरपंचायतीच्या 17 सदस्यांच्या निवडीकरीताही निवडणूक प्रक्रिया होत आहे. अकलूज, पंढरपूर व अक्ककोट या ‘ब’ वर्गीय नगरपालिकांच्या निवडणूकीसाठी प्रांताधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. तर उर्वरीत सर्व ‘क’ वर्गीय नगरपालिकेसाठी तहसीलदार हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूका घेण्याचे नियोजन महसूल खात्याकडून सुरु करण्यात आले आहे. आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हाधिकारी, तहसील व प्रांताधिकारी कार्यालयातील निवडणूक यंत्रणेने निवडणूक प्रक्रियेच्या कामास सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाने पहिल्या टप्यात नगररपालिका व नगरपरिषदांच्या निवडणूका जाहीर केल्या आहेत. या निवडणूका झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणूका होणार आहेत.
आचारसंहिता लागू
जिल्ह्यातील 11 नगरपालिका आणि एक नगरपरिषदेसाठी एकूण 4 लाख 44 हजार मतदार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली. या मतदारांकडून 2 डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे. तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार असून, मंगळवारीपासूनच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.