सोलापूर : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून राज्यात विविध ठिकाणी वसतिगृह चालवल्या जातात. 55 शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थी क्षमता वाढवली आहे. राज्यातील अनुसूचित जातीतील एक हजार 295 विद्यार्थ्यांच्या जागा यात वाढलेल्या आहेत. वाढलेल्या या जागेमुळे या प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहून पुढील शिक्षण घेता येणार आहे.
सामाजिक न्याय विभागाने अनुसूचित जातीतील मुला-मुलींची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक प्रगती व्हावी. तसेच समाजातील अन्य समूह घटकांप्रमाणे त्यांना चांगले जीवन जगता यावेत. व, मोठ्या शहरात राहून त्यांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळाव्यात याच उद्देशाने सामाजिक न्याय विभागाच्या वतीने वसतिगृह चालवल्या जातात.
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जातीतील विद्यार्थी व विद्यार्थीनींच्या शिक्षणासाठी या विभागांतर्गत शासकीय वसतिगृहे ही योजना राबवली जाते. या विभागातंर्गंत राज्यात 441 शासकीय वसतिगृहे चालवल्या जात आहेत. सध्या 230 विद्यार्थी व 211 विद्यार्थिनीसाठी वसतिगृहे चालवल्या जात आहेत. या वसतिगृहात राहून 20 हजार 320 विद्यार्थिनी ह्या शिक्षण घेतात. तर 23 हजार 570 विद्यार्थी मिळून एकूण 42 हजार 890 विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सकाळी नाष्टा, सकाळ व संध्याकळी असे दोन वेळचे जेवणासह दैनंदिन खर्चासाठी निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य, विद्यार्थींना स्वच्छता प्रसाधनांसाठी अतिरिक्त वाढीव भत्ता, शैक्षणिक गणवेश, वैद्यकीय साहित्य, पावसाळ्यात रेनकोट, गमबूट, कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, शैक्षणिक सहल, कार्यशाळा, स्नेहसंमेलन, करमणूक व्यवस्थेसाठी भत्ता, क्रीडा वस्तू खरेदीसाठी लागणारी रक्कमही राज्य सरकारकडून दिल्या जातात.
सुमारे पंचवीस टक्के क्षमतावाढ
सामाजिक न्याय विभागाची 441 वसतिगृहे शासकीय इमारतींमध्ये स्थलांतरित झालेली आहेत. यापैकी 55 वसतिगृहांच्या विद्यार्थी संख्येत वाढ करण्यात आली आहे. यामुळे, यापूर्वी 75 ते 80 विद्यार्थी क्षमता असलेल्या वसतिगृहात यापुढे 100 विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केली जाणार आहे.