सोलापूर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चालू व बचत खात्यातून प्रत्येकी 15 हजार रुपये काढण्याची परवानगी मिळावी यासाठी श्री समर्थ सहकारी बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (आरबीआय) मेल पाठवला आहे. त्याला आरबीआयने परवानगी दिल्यास बँकेतून लगेचच पैसे देण्यास सुरुवात करण्यात येईल. याशिवाय मेडिकल इमर्जन्सी, पगार आणि वीज बिलासाठी भरण्यासाठी जर खातेदार, ठेवीदाराकडे पैसे नसतील तर त्यांनाही पैसे देण्यास आरबीआयने सवलत दिल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे यांनी दैनिक ‘पुढारी’स विशेष मुलाखतीत दिली.
समर्थ सहकारी बँकेच्या व्यवहारावर रिझर्व्ह बँकेने बंधने घातल्याने एकच खळबळ उडाली. एक लाख खातेदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. या पार्श्वभूमीवर बँकेचे अध्यक्ष अत्रे यांची विविध विषयांवर प्रस्तुत प्रतिनिधीने मुलाखत घेतली. अध्यक्ष यांची सविस्तर मुलाखत अशी...
प्रश्न : पैसे बँकेत अडकून पडल्याने खातेदार, ठेवीदार संतप्त, हतबल झाले आहेत. त्यावर बँक कसा मार्ग काढत आहे?
उत्तर : रिझर्व्ह बँकेने त्यांच्या आदेशात तीन सवलती अगोदरच दिल्या आहेत. मेडिकल इमर्जन्सी, कामगारांचे पगार आणि वीज बिलासाठी पैसे काढता येणार आहेत. ते पैसे कशा पद्धतीने देता येतील याबाबत रिझर्व्ह बँकेकडे मार्गदर्शन सूचना आम्ही मागविल्या आहेत. याशिवाय दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चालू व बचत खात्यातून प्रत्येकी 15 हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी आम्ही मेलद्वारे रिझर्व्ह बँकेकडे केली आहे. त्यास परवानगी मिळाल्यास खातेदार, ठेवीदारांना लवकरच बँकेतून पैसे मिळणे सुरू होईल.
प्रश्न : मोठ्या कर्जदारांमुळे बँक अडचणीत आल्याचे बोलले जाते?
उत्तर : मोठ्या कर्जदारांची वसुली आम्ही खूप आधीपासून सुरू केली आहे. 180 कोटी रुपयांची वसुली होती, त्यातील 110 कोटी रुपयांची वसुली केली आहे. येत्या सहा महिन्यांत उरलेली सर्व वसुली पूर्ण करणार आहोत.
प्रश्न : पाच लाखांपर्यंतच्या ठेवींना विम्याचे संरक्षण आहे. त्यापेक्षा जास्त रकमेच्या ठेवीबाबत आपली भूमिका काय?
उत्तर : पाच लाखांपर्यंतच्या ठेवींना विम्याचे संरक्षण असले, तरी देखील इतर मोठ्या ठेवींना देखील कसलाही धक्का लागणार नाही. आम्ही प्रत्येक ग्राहकांचे पैसे देणार आहोत. पाच लाखांच्या ठेवीसाठी तीन महिन्यांची मुदत आहे, परंतु त्या अगोदर ठेवी दिल्या जातील.
प्रश्न : संचालक मंडळाची भूमिका काय आहे. आत्तापर्यंत कोणतेही संचालक समोर का आले नाहीत?
उत्तर : बँकेचे संपूर्ण संचालक मंडळ आमच्या सोबत आहे. काही संचालक बाहेरगावी होते तेसुध्दा सोलापुरात आले आहेत. याप्रसंगी बँकेचे संचालक मंडळ एकत्र आहे. बँकेला सावरण्यासाठी आत्ताही प्रत्येक संचालक आपापल्यापरीने प्रयत्न करत आहेत.
प्रश्न : समर्थ बँक दुसऱ्यांच्या ताब्यात देणार असल्याची चर्चा आहे.
उत्तर : जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना संचालक मंडळात स्थान देणे आमचे काम आहे. ते संचालक झाले तरी देखील सहकार कायद्यानुसार त्यांना एक मताचाच अधिकार आहे आणि सभासदांच्या मतदानावरच ते निवडून येणार आहेत. त्यामुळे बँक अन्य कुणाच्या ताब्यात वैगेरे जाणार नाही. आमचे संचालक राहतील तसे इन्व्हेस्टरांचे देखील काही संचालक घ्यावे लागतील.
प्रश्न : समर्थ बँकेचे स्मॉल फायनान्समध्ये रूपांतरण करण्याचा घाट घालण्यात येतोय अशी चर्चा आहे.
उत्तर : असा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही किंवा असा कोणताही निर्णय झालेला नाही. ही सहकारातील बँक आहे. आरबीआयच्या धोरणाप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ.
प्रश्न : बँक अडचणीत असताना कर्मचाऱ्यांची पगारवाढ का केली?
उत्तर : बँकेच्या तांत्रिक अडचणींमुळे रिझर्व्ह बँकेने बंधने घातली आहेत. बँक पूर्णपणे मजबूत आहे. चार वर्षांत कर्मचाऱ्यांची पगारवाढ केली नव्हती. त्यामुळे पगारवाढ करावी लागली. त्याचे गेट टूगेदर देखील पार पडले. यामुळे बँकेवर कोणताही बोजा आलेला नाही, येणार नाही.
प्रश्न : बँकेची सध्याची आर्थिक स्थिती कशी आहे?
उत्तर : बँकेकडे सध्या 650 कोटींच्या ठेवी आहेत. त्यामध्ये 300 कोटींचे कर्ज वाटप आहे. त्यापैकी 110 कोटी रुपयांची कर्ज वसुली थकीत आहे. दर महिन्याला 20 ते 30 कोटी रुपयांपर्यंतची वसुली सुरू आहे. मार्च 2026 च्या अगोदर संपूर्ण वसुली करण्याचे आमचे टार्गेट आहे.
प्रश्न : बँकेच्या खातेदारांना काय संदेश द्याल?
उत्तर : एक लाख खातेदारांनी बँकेवर प्रचंड विश्वास दाखवला आहे, हीच आमची सामुग्री आहे. दुर्देवाने बँकेवर ही परिस्थिती आली आहे. परंतु, खातेदारांच्या एका पैशाचेही नुकसान होणार नाही. बँकेच्या खातेदारांना सध्या होत असलेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. बँकेवरील निर्बंध हटविण्यासाठी संपूर्ण संचालक मंडळ प्रयत्नशील आहे.