सोलापूर : सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने लातूूर येथे सापळा रचून जबरी चोरी करणार्या इराणी टोळीतील आंतरराज्य गुन्हेगारास अटक केली. त्याच्याकडून पाच तोळे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले. अलिरजा ऊर्फ अलिरजाक शेखू वेग (इराणी) असे त्याचे नाव असून त्याच्यावर महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशात जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
गेल्या 20 जुलै रोजी रेल्वे स्टेशन परिसरात गांधी पुतळ्याजवळ मीरा शिवाजी उबाळे (रा. बेंगलुरू, कर्नाटक) यांच्या गळ्यातील पाच तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी हिसकावून नेले होते. याबाबत सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास सोलापूर शहर गुन्हे शाखेने सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार, राजकुमार पवार यांनी सीसीटीव्हीचा बारकाईने अभ्यास करून सदर गुन्हा करणार्या इसमाची माहिती मिळवली.
सदर गुन्हा रेकॉर्डवरील सराईत चैन स्नॅचर अलिरजा ऊर्फ अलिरजाक ऊर्फ लल्ला शेखू वेग (इराणी) (वय 31, रा. शिवाजी नगर, टी.पी.एस रोड, ता. परळी, बीड) याने केल्याचे निष्पन्न झाले. हा गुन्हेगार 27 जुलै रोजी सदर गुन्हेगार लातूर येथे येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानुसार शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकाने लातूर शहरातील सम्राट चौकातील, महाराष्ट्र टायर्स येथून सापळा रचून त्यास ताब्यात घेतले.तो गुन्हा साथीदारांच्या मदतीने केल्याचे त्याने मान्य केले. त्यातील पाच तोळ्याचे मंगळसूत्रही काढून दिले. त्याच्यावर महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशात गुन्हे दाखल आहेत.
पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलिस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. पथकातील शैलेश खेडकर, संदीप जावळे, विनोद रजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, सतीश काटे, बाळासाहेब काळे, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी कामगिरी पार पाडली.