सोलापूर : बोगस कागदपत्रांव्दारे अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिल्याप्रकरणी तत्कालीन शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक यांच्यासह चौघांवर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथील खासगी अनुदानित संस्थेतील लिपीक शिवशंकर सिद्रामप्पा स्वामी यांनी 2014 साली स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांचा पेन्शनचा प्रस्ताव मुख्याध्यापक महादेव केशव माने यांच्या सहीने शिक्षणाधिकार्यांकडे पाठविण्यात आला. तो प्रस्ताव मान्य होऊन पेन्शनही सुरू झाली. 2016 साली शिवशंकर हे मयत झाले. शिवशंकर यांचा मुलगा श्रीशैल स्वामी याला अनुकंपा तत्त्वावर शिक्षक म्हणून नियुक्तीचा प्रस्ताव 6 मे 2022 रोजी सस्थेच्या अध्यक्ष मधुमती महादेव माने यांच्या सहीने शिक्षणाधिकार्यांकडे पाठविण्यात आला.
माध्यमिकचे तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी कोणतीही शहानिशा न करता या प्रस्तावास मंजुरी दिली. शिवशंकर स्वामी यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन ते मयत झाल्याने त्यांच्या मुलास अनुकंपा तत्त्वावर सामावून घेता येत नाही. तरीही बाबर यांनी याची कोणतीही खातरजमा केली नाही. त्यांचा प्रस्ताव उपसंचालकांकडे पाठवून दिला आणि मंजुरी दिली. त्यानंतर संस्थेच्या पदाधिकार्यांनी तक्रार दिल्यानंतर शिक्षणाधिकारी, उपसंचालक यांनी सुनावणीस बोलावले पंरतु ते हजर राहिले नाही. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष स्वामीराव पाटील यांनी अक्कलकोट न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्कर बाबर, मुख्याध्यापक महादेव माने, तत्कालीन अध्यक्ष मधुमती माने, श्रीशैल स्वामी यांच्यावर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.