टेंभुर्णी : पुणे–सोलापूर महामार्गावर टेंभुर्णी जवळ शिराळ (टें) हद्दीत रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात पाटबंधारे विभागातील तरुण कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. कार दुभाजकास धडकून पलट्या खात सिमेंट बल्करवर आदळल्याने हा अपघात झाला. या घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक जवळपास दोन तास ठप्प झाली होती.
रविवारी दुपारी सुमारे ३.४५ वाजता हा अपघात हॉटेल जयमल्हार समोर घडला. मिळालेल्या माहितीनुसार, संदीप राजाराम पाटील (वय ३६) हे त्यांच्या मित्रासह स्विफ्ट कार (क्रमांक एमएच-१० सीआर-५७४२) मधून इंदापूरच्या दिशेने जात होते. कार हॉटेल जयमल्हारजवळ पोहोचल्यावर रस्त्याच्या दुभाजकास धडकली आणि पलटी होऊन विरुद्ध लेनवर गेली. त्याच वेळी पुणेहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या सिमेंट बल्करवर (क्रमांक एमएच-१२ केएक्स-३८८०) ही कार जोरात आपटली.
या भीषण धडकेत कार चालक संदीप राजाराम पाटील यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर कारमधील बाळकृष्ण परमेश्वर गुरव (वय २८, रा. कुरुल, ता. मोहोळ) आणि बल्कर चालक लालजी पलातुराम कनोजिया (वय ३५, रा. मजावू कला हनुमानगंज, ता. उधावली, जि. बस्ती, उत्तर प्रदेश) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. दोन्ही लेनवर अपघाताचे अवशेष पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. मयत संदीप पाटील हे भिमानगर येथील भीमा पाटबंधारे विभागात लिपिक म्हणून कार्यरत होते. अलीकडेच ते टेंभुर्णी येथे कुटुंबासह वास्तव्यास होते. त्यांच्या निधनाने सहकारी व मित्रपरिवारात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सरडे करत आहेत.