सोलापूर : राज्य शासनाने मंगळवारी शक्तीपीठ महामार्गासाठी मंजुरी दिलेली असतानाच या महामार्गाला शेतकर्यांमधून विरोध होत आहे. बार्शी तालुक्यातील जवळगाव मध्यम प्रकल्पात एक जुलैला सामूहिक जलसमाधी आंदोलन केले जाणार असल्याची माहिती धरणग्रस्त शेतकरी दिलीप जाडकर यांनी दिली.
बार्शी तालुक्यातील जवळगाव मध्यम प्रकल्पाचे धरणग्रस्त शेतकरी सध्या गंभीर संकटाला सामोरे जात आहेत. हत्तीज, शेळगाव येथे शासनाकडून पुनर्वसनासाठी मिळालेली शेतजमीन आता शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पासाठी जबरदस्तीने संपादित केली जात आहे. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे.
याबाबत तहसीलदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, राज्य सरकार यांना निवेदने देऊनही शेतकर्यांच्या हरकती न ऐकताच पुन्हा प्रशासनाने पोलिस बळाचा वापर करून शेळगाव व वाणेवाडी परिसरात जबरदस्तीने मोजणी सुरू केली आहे.
धरणग्रस्त शेतकर्यांनी आरोप केला की ही जमीन त्यांना आधीच पुनर्वसनासाठी दिली आहे. तीच जमीन पुन्हा संपादित केली जात आहे.
पुनर्वसनासाठी दिलेल्या जमिनीचे संपादन थांबवावे
पर्यायी जमीन तत्काळ उपलब्ध करावी
जबरदस्तीच्या पोलिसी कारवाईची चौकशी व्हावी
पोलिसांकडून झालेल्या जखमी शेतकर्यांना नुकसानभरपाई द्यावी
सरकारने संवेदनशीलतेने थेट संवाद साधावा