सोलापूर

Yatin Shah: जागतिक दबाव न जुमानता प्रिसिजनचा आणखी एक प्रकल्प

चेअरमन यतीन शहा यांची माहिती; सोलापुरात 250 नवे रोजगार उपलब्ध होणार

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : प्रिसिजन कॅमशॉफ्टने चिंचोळी एमआयडीसीत 45 एकर जागेवर नवीन प्रकल्प सुरू केला आहे. त्याचेे विस्तारीकरण करण्यात येत असून त्यामुळे 250 नवे रोजगार उपलब्ध होणार आहेत. येत्या जून 2026 पर्यंत प्रकल्प कार्यन्वित होईल. हा प्रकल्प आपल्याच देशात सुरू व्हावा यासाठी विदेशातूनच काय पूर्ण भारतातील काही मोठ्या सेंटर्सवरून आमच्यावर दबावही होता. मात्र, आम्ही त्या सर्वांना न जुमानता सोलापुरातच प्रकल्प उभा करण्याचा निश्चय केला, तो पूर्णत्वास नेला, अशी माहिती प्रिसिजन उद्योग समुहाचे चेअरमन यतीन शहा यांनी दिली.

चिंचोळी एमआयडीसीत प्रिसिजनचे कॅमशॉफ्ट उत्पादनाचे युनिट आहे. त्याच्या बाजूला 45 एकर जागेवर या कॅमशॉफ्ट उत्पादनाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी नवा प्रकल्प उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. यामध्ये कॅमशॉफ्ट सह इलेक्ट्रिक व्हेईकलचा प्रकल्पही उभारण्यात येणार आहे. कॅमशॉफ्ट बनविण्यासाठी जगातील सर्वोत्कृष्ट टेक्नॉलॉजी वापरण्यात येत आहे.

भारतात पहिल्यांदाच अशी आधुनिक टेक्नॉलॉजी सोलापुरात उभी रहात आहे. सध्या वर्षात आठ लाख कॅमशॉफ्टचे उत्पादन जुन्या प्लांटमध्ये करण्यात येत आहे. आता नव्या प्रकल्पामध्ये महिन्याला एक लाख कॅमशॉफ्ट बनविण्याचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी दोन लाख स्क्वेअर फूट बांधकामाचे काम सुरू आहे. त्यासाठी मोठी गुंतवणूक केल्याचे शहा यांनी सांगितले.

भारतात उद्योगवाढीला मोठी संधी

सध्या युरोपीय देशात आर्थिक मंदीमुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. 35 टक्के कंपन्या बंद पडल्या आहेत. तेथे उद्योग उभारण्यासाठी अनेक अडचणी आहेत. तेथील नियम व अटी जाचक आहेत. त्या तुलनेत भारतात उद्योग उभारणीसाठी कोणताही अडचण येत नाही. प्रशासकीय मान्यता घ्याव्या लागतात, परंतु त्या अडचणीच्या नाहीत. सध्या जागतिक स्तरावर आर्थिक मंदी आहे, पण भारताची आर्थिक स्थिती मात्र स्थिर आहे. भारताची आर्थिक व्यवस्था बळकट होत चालली आहे. जीएसटीचे दर कमी केल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस मिळाला. पुढील काळात भारतात उद्योगवाढीला मोठी संधी असल्याचे मत प्रिसिजन उद्योग समूहाचे चेअरमन शहा यांनी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT