सोलापूर : आपले उभे आयुष्य जंगलात घालवून अनुभवांना शब्दरूप देत मराठी साहित्य विश्व समृद्ध करणारे लेखक, वनअभ्यासक आणि अरण्यऋषी अशी ओळख निर्माण करणारे मारुती चितमपल्ली यांचे देहावसान झाले.
सोलापुरात पार पडलेल्या 83 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवलेले पद्मश्री मारुती भुजंगराव चित्तमपल्ली हे 94 वर्षांचे होते. त्यांचे वर्धक्याने सोलापुरातील अक्कलकोट रोडवरील मणिधारी एम्पायर सोसायटीतील निवासस्थानी बुधवारी (दि. 18) सायंकाळी सात वाजून 50 मिनिटांच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा गुरुवारी (दि. 19) दुपारी एक वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. रुपाभवानी मंदिर परिसरातील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे भावजय, दोन पुतणे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
नुकताच त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार स्वीकारला होता. दिल्लीवरून आल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. अलीकडे त्यांनी अन्न घेणे बंद करून दूध घेण्यावर भर दिला होता. सोलापुरात जन्मलेले मारुती चित्तमपल्ली सरकारी नोकरीच्या निमित्ताने विदर्भातील अरण्यांमध्ये, वनांमध्ये दीर्घकाळ रमले. अगदी अलीकडेच ते सोलापुरात पुन्हा वास्तव्यास आले. आईमुळे त्यांना निसर्गाची, अरण्याची ओढ निर्माण झाली. त्यानंतर लिंबामामा हे त्यांचे अरण्यविद्येतील दुसरे गुरू. प्राणी, पक्ष्यांसह वनस्पतींविषयी त्यांच्या मनात प्रचंड कुतूहल होते. यातूनच त्यांनी वानिकी महाविद्यालयातील प्रवेशाची निश्चिती मिळाली. मारुती चितमपल्लींची कोइमतूरच्या सदर्न फॉरेस्ट रेंजर्स कॉलेज या वानिकी महाविद्यालयात दोन वर्षांच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली.
वनखात्याची नोकरी मारुती चित्तमपल्लींना वनखात्यातील नोकरीत ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अलींचा सहवास खूप काही शिकवून गेला. वनखात्यातील नोकरीच्या निमित्ताने चित्तमपल्लींनी अनेक ठिकाणचे जंगल पिंजून काढले. पश्चिम महाराष्ट्रात 15 वर्षे नोकरी केल्यानंतर ते विदर्भात नवेगाव बांधला आले. त्यानंतर नागझिरा, नागपूर, मेळघाट येथली जंगले अनुभवली. मात्र त्यांना नवेगाव बांधचे जंगल अधिक आवडले. शिकारासाठी येणारे माधवराव पाटील त्यांनी तेथेच भेटले. शिकारीच्या निमित्ताने आपल्या सोबत्यांकडून माधवराव वनविद्या शिक्ले आणि ही वनविद्या त्यांच्याकडून चित्तमपल्लींना शिकता आली. मात्र, ही वनविद्या साध्य करायला त्यांना अनेक वर्षे लागली.
मारुती चित्तमपल्ली यांनी परंपरागत पद्धतीने संस्कृत साहित्याचे अध्ययन केले आणि त्यानंतर जर्मन आणि रशियन भाषांचा अभ्यास केला. रामटेकच्या कालिदास संस्कृत विद्यापीठाच्यावतीने प्राचीन भारतीय साहित्यातील पर्यावरण असा एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविला जातो. चित्तमपल्ली यांनी 84व्या वर्षी त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि तो अभ्यासक्रम पूर्णही केला.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजी शब्दांना मराठीत दिलेले पर्यायी शब्द आज रुळलेत. तसेच कार्य जंगलाच्या बाबतीत मारुती चित्तमपल्ली यांनीही करून ठेवले आहे. अरण्य आणि त्याभोवताल विणल्या गेलेल्या विश्वातील कितीतरी घटकांना चित्तमपल्ली यांनी आपल्या शब्दांमध्ये गुंफले आहे. पक्षी असोत की वनस्पती, कितीतरी नवी नावे केवळ त्यांच्यामुळे मराठी साहित्यात नोंदली गेली आहेत. या मूळ तेलगू भाषिक माणसाने मराठीला सुमारे एक लाख शब्दांचा खजिना उपलब्ध करून दिला आहे. चित्तमपल्लींनी पक्षीशास्त्रातील अनेक संज्ञांचे मराठी नामकरण केले आहे. जसे कावळ्यांच्या वसाहतीला इंग्रजीत रूकरी असा शब्द आहे.
चित्तमपल्लींनी त्यासाठी काकागार हा शब्द योजला. तसेच हेरॉनरी (बगळे, ढोकरी ह्या पक्ष्यांची वीण वसाहत) ला सारंगागार असा समर्पक शब्द मराठीत तयार केला आहे. रूस्टिंग प्लेससाठी रातनिवारा हा शब्द वापरला आहे. टणटणी (घाणेरी)चे रायमुनिआ (हिंदीभाषक) तर बहाव्याचे अमलताश हे नाव चित्तमपल्लींमुळे नागरी वाचकांस माहीत झाले. मारुती चित्तमपल्ली यांना त्यांच्या निसर्ग क्षेत्रातील अभ्यासामुळेच पक्षितज्ज्ञ व निसर्गलेखक ही ओळख मिळाली, आणि त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली.
मारुती चित्तमपल्ली यांनी वने, वन्यप्राणी, वन्यजीव व्यवस्थापन, आणि पक्षिजगताविषयी उल्लेखनीय संशोधन केले; आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग आणि निबंधवाचन केले. सेवाकाळात आणि निवृत्तीनंतर अनेक संस्था, समित्या यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. राज्य वन्यजीव संरक्षण सल्लागार समिती, मराठी अभ्यासक्रम समिती (औरंगाबाद) चे ते सदस्य होते. तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचेही ते संचालक होते.
पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांच्यावर 20 वर्षांपूर्वी पीएचडी केली आहे. प्राणीमात्रांवर जीवापाड प्रेम करणारे व्यक्तमत्व होते. स्वःताच्या अभ्यासाच्या जीवावर, लेखनाच्या तपस्येवर त्यांनी हे सर्व कमावले होते. आयुष्यभर त्यांनी प्राणी, जीवसृष्टी, पक्षी यांचा ध्यास घेतला होता. मंगळवारी (दि. 17) त्यांची घरी जाऊन भेट घेतली. त्यांनी गेल्यावर हात जोडून नमस्कार केला. त्यांच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्याने ते हतबल झाल्याचे दिसले. एरव्ही ते कधीही हतबल होत नव्हते. मला यातून सोडवा अशी हार्त हाक ते देत होते. माझं आता संपलं आहे असेही ते सांगत होते. एका मोठ्या लेखकाला, अरण्यऋषीला आपण मुकलो आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.डॉ. सुहास पुजारी, चित्तमपल्ली यांच्यावर पीएचडी करणारे लेखक.
83 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ते अध्यक्ष म्हणून सोलापुरात आले. तेव्हा पहाटे रेल्वे स्थानकावर त्यांच्या स्वागताचे भाग्य मला लाभले होते. अनेकदा विविध साहित्यांची ते माझ्याकडे मागणी करत. तेव्हा मी ते साहित्य विविध वाचलयांमधून शोधून त्यांना नेऊन देत असे.- पद्माकर कुलकर्णी, मसाप, जुळे सोलापूर.
मारुती चितमपल्ली यांना भारती विद्यापीठाचा जीवनसाधना पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या रानवाटा या पुस्तकाला राज्य पुरस्कार उत्कृष्ट साहित्यानिर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र राज्याच्या मराठी विभागाकडून दिलेला विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे. यासह असंख्य पुरस्कार त्यांना लाभलेले आहे.