बार्शी : तालुक्याच्या पूर्व भागातील ढेंबरेवाडी, घोळवेवाडी शिवारातील वनखात्याच्या डोंगराला आग लागून तब्बल 100 एकर क्षेत्राला याची झळ बसली. आंब्याची बाग, नारळाच्या झाडांची नुकसानी झाली.
या आगीची झळ ढेंबरेवाडी व घोळवेवाडीतील अनेक शेतकर्यांना बसली. या आगीत विक्रीसाठी आलेली आंब्याची बाग, बोरवेल, नारळ, पीव्हीसी पाईप, शेणखताचे ढिगारे,, कडब्याची गंज, स्प्रिंकलर सेट आदी साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. बार्शी तालुक्यातील आगीच्या घटना काही केल्या थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाहीत. पांढरी येथील बालघाट डोंगररांगा जळीत घटनेनंतर काल भालगाव व ढेंबरेवाडी येथे आगीच्या घटना घडल्यामुळे तालुक्यात भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यातील सरहद्दीवरील ढेंबरेवाडी शिवारात भरदिवसा दीड वाजता वन विभागाच्या डोंगराला अचानक आग लागली. या आगीने लगत शेती असलेल्या व आंब्याची बाग व इतर पिके असलेली शेती आपल्या कक्षेत घेतली. त्यामुळे ढेंबरेवाडी शिवारातील गट नंबर 26 मधील राजश्री शंकर घोळवे यांच्या विक्रीला आलेले आंब्याची बाग व इतर शेती उपयोगी साहित्य, जनावरांचा चारा आदी जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबरोबरच गणेश लाटे, वसंत घोळवे, रंजन घोळवे, शंकर घोळवे, नंदकुमार घोळवे, सागर घोळवे, उषा बाबूराव घोळवे, वामन नागटिळक, सुनिल नागटिळक, अनंत घोळवे यांचे नुकसान झाले.
वनविभागाच्या वतीने व महसूल खात्याने घटनास्थळी भेट द्यावी. त्वरीत पंचनामा करून संबंधित नुकसानग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे.