सोलापूर : सध्या सोन्याचे दर प्रतितोळा एक लाख 34 हजार 200 रुपयांच्या आसपास पोहोचले आहेत. तरीही सोलापूरकरांची सोने खरेदीची हौस अजिबात कमी झालेली नाही. शहरातील सराफ बाजारात सोमवारी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. धनत्रयोदशी दिवशी कोट्यवधीची उलाढाल झाली होती. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याला मोठ्या प्रमाणात बाजार बहरण्याची शक्यता सराफ व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली, चांदीचा दर प्रतिकिलो एक लाख 75 हजार 400 रुपये होता. सात रस्ता, सराफ बजार, व्हीआयपी रोड, स्टेशन रोड परिसरातील
ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात दागिन्यांची खरेदी सुरू आहे. विशेष म्हणजे सोन्याचे दर गेल्या आठवड्यापेक्षा जवळपास 500 ते 700 रुपयांनी वाढले असूनही ग्राहकांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. सोमवारी (दि. 20) बाजारात सोन्याचा भाव प्रति तोळा एक लाख 34 हजार 200 रूपये होता.
कमी वजनाचे दागिने, सोन्याचे नाणे आणि अंगठ्या यांना सर्वाधिक मागणी होती. काही दुकानांनी ‘नो मेकिंग चार्ज’ किंवा ‘डिस्काउंट ऑफर’ देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीष देवरमनी यांनी दिवाळीपूर्व आठवड्यात सोन्याची उलाढाल नेहमीपेक्षा 25 ते 30 टक्क्यांनी वाढली असल्याचे सांगितले.
सोने खरेदी ही शुभ मानली जाते, किंमत काहीही असो पण सणासुदीला सोने विकत घेतलेच पाहिजे, अशा ट्रेंड असल्याने महागाईच्या काळातही सोलापूरकरांच्या मनात सोन्याचे तेज कमी झालेले दिसत नाही. त्यामुळे साडेतीन महूर्तापैकी एक असलेल्या पाडव्याला मोठ्या प्रमाणात बाजार बहरण्याची शक्यता आहे.
सोने : 1 लाख 34 हजार 200 (प्रतितोळा, जीएसटीसह)
चांदी : 1 लाख 75 हजार 400 (प्रतिकिलो, जीएसटीसह)