सोलापूर : जमिनीतून गुप्तधनाचा हंडा काढून देतो, असे सांगून एक कोटी 26 लाख 34 हजार 600 रुपये हडपल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला. याप्रकरणी मोहम्मद कादर शेख या भोंदूबाबासह सातजणांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या भोंदूबाबाविरोधात काही दिवसांपूर्वी जेलरोड पोलिसांत असाच गुन्हा दाखल होऊन त्यास अटक झाली आहे.
अक्कलकोट रोडवरील रहिवासी राजू विनायक आडम यांना भोंदूबाबा मोहम्मद कादर शेख याने गुप्तधनाचा हंडा काढून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर आडम यांना काहीतरी द्रव पिण्यास देऊन जादूटोणा केला. 2023 पासून त्याच्याकडून वेळोवेळी एक कोटी 26 लाख 34 हजार 600 रुपये घेतले. आडम यांनी 15 ऑक्टोंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भोंदूबाबा मोहम्मद कादर शेख, तमीम कुरेशी, आयुब रचभरे, सचिन गायकवाड, दाऊद पठाण, लक्ष्मण वाघमारे यांच्या विरोधात फसवणूक तसेच जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक वाघमारे करीत आहेत.
अनेकांना लुबाडले
भोंदूबाबा मोहम्मद कादर शेख याने या अगोदर गुप्तधन काढण्याचे आमिष दाखवून गोविंद मल्लिकार्जुन चंगारी यांच्याकडून एक कोटी 87 लाख 31 हजार 300 रुपये हडपले आहेत. याबाबत काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर शेख याचा दुसरा कारनामा उघड झाला आहे. दोन्ही मिळून तीन कोटी रुपये हडपण्यात आले आहेत. अनेकजण या भोंदूबाबाच्या शिकारीचे बळी झाले असावेत; परंतु बदनामीच्या भीतीने पुढे येण्यास तयार नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.