पंढरपूर : कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा दि. 2 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. या सोहळ्याकरीता सुमारे 8 ते 10 लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तवला जात आहे. त्यानुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने देखील भाविकांना सेवा देण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळावे म्हणून दर्शन रांग उभारण्यात आलेली आहे. या दर्शन रांगेत पत्राशेड येथे कायमस्वरूपी 4 आणि तात्पुते 4 असे 8 दर्शन मंडप उभारण्यात आलेले आहेत. तर दर्शन रांग गोपाळपूर गावापर्यंतेउभारण्यात येत आहे.
कार्तिकी यात्रा ही आषाढी यात्रे नंतरची मोठी यात्रा असते. या यात्रेला महापूजा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत. तसेच या यात्रेला लाखोंच्या संख्येने भाविक येत असल्याने जिल्हा प्रशासन व स्थानिक प्रशासनाबरोबरच मंदिर समितीकडून देखील यात्रेची जोरदार तयारी सुरू आहे. सद्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता दर्शन रांग पुर्ण तयारीने उभारण्यात आलेली आहे. पत्राशेड येथे 8 पत्राशेड उभारण्यात आले आहेत. कार्तिकी यात्रा काळात विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग पत्राशेड भरून गोपाळपूर रोडला जात असते. यासाठी पत्राशेड येथे 8 दर्शन मंडप उभारण्यात आले आहेत. या पत्राशेड मध्ये यंदा भाविकांना मिनरल शुध्द पिण्याचे पाणी (मिनरल वॉटर), लिंबू सरबत, नाष्टा, चहा व भोजन दिले जाणार आहे. त्याचबरोबर दर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये म्हणून या भागात सर्वत्र सीसीटीव्ही बसवण्यात येत आहेत.
प्रथमोपचार केंद्रे, तात्पुरती शौचालयांची सुविधा उभारण्यात आली आहे. तसेच चोख पोलीस बंदोबस्त देखील असणार आहे. तसेच ठिकठिकाणी मंदिरातील विठुरायाच्या थेट दर्शनाच्या स्क्रीन लावण्यात येत आहेत. लाऊड स्पिकरवरून भक्तिगीते ऐकवली जाणार आहेत. दर्शन मंडपाच्या शेजारी वृद्ध भाविकांना विश्रांती कक्ष उभारण्यात आले आहेत. महिलांहसाठी हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी प्रथमोपचार देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सद्या भाविकांची गर्दी वाढत आहे.