पोखरापूर : अंगावर पडणारा पिवळा भंडारा, लाठी व तलवार घेऊन डोळ्यांची पारणं फेडणारी परज, विठ्ठल-बिरुदेवाच्या नावानं चांगभलंच्या गजरात दुमदुमणारे धनगरी ढोल अशा भक्तिमय वातावरणात मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथे दंडीच्या माळावर दीपावली पाडव्या दिवशी धनजी-विठोबा यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.
महाराष्ट्रातील धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल-बिरुदेवाची यात्रा दिवाळी पाडव्याच्या दिवशी गुरू-शिष्याच्या भेटीच्या सोहळ्याने हजारो भाविकांच्या साक्षीने साजरी झाली. दीपावलीच्या पाडव्या दिवशी दुपारी पोखरापूर गावातून पुजाऱ्यांच्या वाड्यातून विठ्ठलाची कन्या भागुबाईची पालखी वाजत गाजत भंडाऱ्याची मुक्तपणे उधळण करत नेण्यात आली. बिरुदेवाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालुन नंतर परज खेळण्याचा कार्यक्रम झाला. त्यात भाकणूक सांगितली गेली.
कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथील विठ्ठल-बिरुदेव या बंधूंनी त्यांची सुमारे 24 वर्षांची तपश्चर्या करत असलेल्या पोखरापूर येथील खेलोबा वाघमोडे (पुजारी) या भक्ताला दंडिचा माळ येथे दर्शन दिले आणि हा गुरू-शिष्य भेटीचा दिवस म्हणजे दिवाळीतील पाडवा होय. त्यामुळे हे माळ पावन झाले, अशी आख्यायिका सांगितली जाते. तेव्हापासून दरवर्षी दीपावलीच्या पाडव्याला याठिकाणी मोठी यात्रा भरते. या यात्रेत सर्व पुजारी, मानकरी, सेवेकरी, सर्व जाती-धर्मातील लोक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.