सोलापूर : पवित्र पोर्टल अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट 3) भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी भावी शिक्षकांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्याकडे केली आहे.
पवित्र पोर्टलमधून शिक्षक भरती प्रक्रिया राबविताना भरती प्रक्रिया एक आणि दोन मधील अपात्र, गैरहजर, माजी सैनिक, समांतर आरक्षणाची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्या जागा त्वरित रूपांतरित करून रिक्त जागांची यादी जाहीर करावे.
जिल्हा किंवा विभागीय भरती प्रक्रिया न करता भरती प्रक्रिया ही पूर्वीप्रमाणे म्हणजेच केंद्रीय पद्धतीनेच राबवावे. संचमान्यता धोरण रद्द करावे. 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळेत कंत्राटी किंवा सेवानिवृत्त शिक्षक ऐवजी पवित्र पोर्टलमधून डी.एड., बी.एड. पात्र उमेदवारांमधून कायम शिक्षक देण्यात यावे. अशा विविध मागण्यांचे निवेदन भावी शिक्षकांनी दिले आहे.
यावेळी अजय पवार, राजकुमार तुपसौंदर, संदीप देशमुख, अली काझी, अमीर तांबोळी, दत्तात्रय कोकरे, ज्योती कवडे, नीलम डांगे, ज्योती नवले, पूजा चव्हाण, अश्विनी माने, प्रशांत शिरगुर आदी उपस्थित होते.
मुलाखतीला आलेल्या शिक्षकांचीच निवड करा
टेट 2022 च्या भरतीत संस्थेमध्ये मुलाखत प्रक्रियेत अनेक गैरप्रकार झाले आहेत. बरेच उमेदवारांनी मुलाखत दिलेल्या असूनही त्यांना अनुपस्थित दाखवून सदर जागा तशीच रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुलाखत दिलेल्या प्रत्येक उमेदवारांना उपस्थित असल्याचा पुरावा संस्थेकडून देणे बंधनकारक करण्यात यावे. तसेच मुलाखतीसाठी आलेल्यांपैकी उमेदवाराची निवड करणे बंधनकारक करावे. अन्य आस्थापना न्यायप्रविष्ट असतील तर ती पदे व्यापगत करावीत, अशी प्रमुख मागणी भावी शिक्षकांनी केली आहे.