सोलापूर

Solapur Politics: अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला भाजपचा धक्का

सोलापुरातील दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये आज प्रवेश

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष तथा मोहोळचे माजी आ. राजन पाटील, माजी आ. यशवंत माने, तसेच माजी आ. बबनराव शिंदे यांचे सुपुत्र तथा सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांचा आज (बुधवारी) मुंबईत भाजपात प्रवेश होणार आहे. त्यासाठी त्यांचे हजारो समर्थक मुंबईला रवाना झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजपच्या या खेळीने सोलापूर जिल्ह्यातील राजकारण बदलण्याची चिन्हे आहेत.

जिल्हा परिषदेत स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने भाजपने जिल्ह्यात ऑपरेशन लोटस्‌‍ मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील अनेक दिग्गजांना गळाला लावले. यामध्ये महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीलादेखील भाजपने सोडलेले नाही. माजी आ. पाटील, माने आणि रणजितसिंह शिंदे यांच्या भाजप प्रवेशाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला भाजपकडून हा मोठा धक्का मानला जात आहे.

बुधवारी मुंबईत भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सर्व मान्यवरांचा पक्ष प्रवेश होणार आहे. त्यासाठी सोलापुरातून हजारो कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या पक्ष प्रवेशासाठी मोठी भूमिका बजावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांबरोबर याविषयी बैठक घेतली आहे. तिथूनच सर्व सुत्रे फिरू लागली.

दरम्यान, पक्षातील गटबाजीमुळे सोलापूर जिल्ह्यात अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बॅकफूटवर असताना, तीन दिग्गज नेते पक्ष सोडून जात असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मात्र, या तीन नेत्यांच्या पक्षप्रवेशाने मोहोळ व माढा तालुक्यात भाजपचे बळ वाढणार आहे.

दिलीप माने, दीपक साळुंखे वेटिंगवर

सोलापूर जिल्ह्यातील पाच माजी आमदारांचा एकत्रित भाजपात प्रवेश होणार असल्याची चर्चा आठवडाभर सुरू आहे. मात्र दक्षिण सोलापूरचे माजी आ. दिलीप माने यांना भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध सुरू केला. त्यांना पक्षात घेऊ नये, यासाठी पक्ष कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आ. सुभाष देशमुख यांनी उघडपणे मानेंच्या पक्षप्रवेशास विरोध दर्शविला. तशातच दक्षिणमधील जुन्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन माने यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला. त्यामुळे दिलीप माने यांचा भाजप प्रवेश तूर्तास लांबणीवर पडला. दुसरीकडे सांगोल्याचे माजी आ. दीपक साळुंखे यांना भाजपने वेटिंगवर ठेवले आहे. त्यांचा भाजपातील प्रवेश का रखडला, याबाबत सांगोल्यात उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT