(File Photo)
सोलापूर

Solapur News: सांगोल्यातील भाजपची हुल्लडबाजी शेकापच्या पथ्यावर

भाजप आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्यातील राजकीय संघर्ष चव्हाट्यावर; बाटली फेकमुळे असंतोष

पुढारी वृत्तसेवा

सांगोला : गेल्या दोन वर्षांपासून सांगोला तालुक्यात भाजप आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्यातील राजकीय संघर्ष तापलेला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शेकापमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू ठेवले. या प्रयत्नांतून लोकसभा निवडणुकीत भाजपला तालुक्यात मताधिक्य मिळवण्यात यश आले. या मताधिक्याचा फायदा घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने प्रवेश सोहळ्यांचे नियोजन केले.

परंतु या सोहळ्यात घडलेल्या दारू बाटली फेक प्रकरणाने सर्व गणिते बदलली. दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानावर एका माथेफिरूने बाटली फेकल्याच्या घटनेने जनतेत संताप निर्माण झाला आणि भाजपने मिळवलेली सहानुभूती एका क्षणात गमावली. उलट शेकापला पुन्हा सहानुभूतीची लाट मिळून तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

लोकसभा निवडणुकीपासून शेकापमधील काही नेते भाजपच्या संपर्कात होते. भाजपला मताधिक्य मिळाले असले, तरी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शेकापचाच प्रभाव कायम राहिला आहे. 1962 पासून आजपर्यंत हीच राजकीय परंपरा कायम आहे. पालकमंत्री गोरे यांनी शेकापमधील दोन आर्थिक बलदंड नेते बाळासाहेब एरंडे आणि मारुती बनकर यांना भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. एरंडे यांनी प्रवेश केला, परंतु बनकर यांनी दूर राहणे पसंत केले. या कार्यक्रमात 200 हून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. डॉ. बाबासाहेब देशमुख आमदार आमच्यामुळे झाले, असे विधान गोरे यांनी केल्यामुळे भाजपमध्येच अस्वस्थता पसरली. सांगोला तालुक्यात जातीय पगडा हा पराभवाबद्दल सूचक भाष्य झाल्याने त्यांचे समर्थक कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

1952 पासून आतापर्यंत फक्त तीन वेळा मराठा समाजाचे आमदार झाले असून, धनगर समाजाचे आमदार तेरा वेळा झाले आहेत. यामध्ये केशवराव राऊत (2 वेळा), गणपतराव देशमुख (11 वेळा) आणि सध्या डॉ. बाबासाहेब देशमुख प्रतिनिधी राहिले आहेत. भाजपने स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी तीन कलमी कार्यक्रम आखला आहे. शेकापमधील मातब्बर नेते प्रवेश झाल्यानंतर दुसऱ्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लवकरच मोठा प्रवेशाचा घाट घातला आहे. त्यानंतर सांगोला विधानसभा मतदारसंघ भाजपमध्ये करण्याचा कार्यक्रम आखला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT