सोलापूर

DCM Eknath Shinde: बळीराजाला सुखी, समाधानी ठेव : उपमुख्यमंत्री शिंदे

पांडुरंगाला साकडं; दर्शन मंडपाचे काम जलदगतीने करण्याची सूचना

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : राज्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट आलेे आहे. पिकांचे खूप मोठे नुकसान झालेे आहे. अशा संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून शासनाने 32 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केलेे आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी समितीची स्थापना केली आहे. बळीराजावर आलेले अरिष्ट दूर कर, त्यांना सुख व समाधानाचे दिवस येऊ दे, असे साकडं पांडुरंगाला घातल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी रामराव वालेगावकर यांच्या हस्ते सपत्नीक झाली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कारप्रसंगी एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, खा. श्रीकांत शिंदे, आ. समाधान आवताडे, आ. अभिजित पाटील, आ. तानाजी सावंत, आ. बापूसाहेब पठारे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व समिती सदस्य तसेच समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपस्थित होते.

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांना कमी वेळ लागावा, तसेच दर्शन रांगेमध्ये पाणी, बैठक व्यवस्थेसह सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्या याकरिता तिरुपतीच्या धर्तीवर दर्शन मंडप निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने 130 कोटींचा निधी मंजूर केला होता. या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेे आहेत. प्रशासनाने हे काम अत्यंत जलद गतीने पूर्ण करून भाविकांना दर्शनाची सुविधा सुलभ व कमी वेळेत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन शिंदे यांनी केले. तसेच श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद केले असून वारकऱ्यांना लवकर दर्शन मिळत आहे. कारण वारकरी हाच व्हीआयपी असल्याचे त्यांनी सांगून वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने चांगले नियोजन केल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्य परिवहन महामंडळामार्फत मानाच्या वारकऱ्यांना वर्षभर एसटीने प्रवास करण्यासाठी मोफत पास दिला जातो. यापुढील काळात या वारकऱ्यांना कायमस्वरूपी एसटीचा मोफत पास देण्यात येणार आहे. तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे असलेली महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाची जागा आणखी पुढे तीस वर्षे राहील, असा करार लवकरच करण्यात येणार आहे. तसेच सर्व्हे नंबर 161 मधील जागा मंदिर समितीला देण्याबाबतचा प्रस्ताव पुढील महिन्यात नगर विकास विभागाला सादर करावा, याबाबतचाही निर्णय तत्काळ घेण्यात येईल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. चंद्रभागा नदीसह सर्व नद्यांच्या प्रदूषण मुक्तीसाठी ठोस कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. यावर्षीच्या कार्तिकी वारीमध्ये भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी अतिरिक्त पाच कोटींचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात आल्याचेही शिंदे म्हणाले.

प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे तसेच मानाचे वारकरी रामराव वालेगावकर व त्यांच्या पत्नी सुशीलाबाई रामराव वालेगावकर यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यावर्षी प्रथमच मानसी आनंद माळी व आर्य समाधान थोरात या दोन शालेय विद्यार्थ्यांची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आलेली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT