तरडगाव : ‘माऊली माऊली...’ आणि हरिनामाच्या गजरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास चांदोबाचा लिंब तरडगाव (ता. फलटण) येथे भक्तिमय वातावरणात पार पडले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील ‘उभे रिंगण’ सोहळा ‘याची देही याची डोळा’ अनुभवताना भाविक व वारकर्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
अश्व धावे अश्वामागे।
अवघा सोहळा पाहावा डोळे भरूनी ।
वैष्णव उभे रिंगणी।
टाळ, मृदंगा संगे।
गेले रिंगण रंगुनी ॥
या काव्यरचनेचा प्रत्यय आणून देणार्या या सोहळ्यात टाळ-मृदंगांचा गजर अन् विठ्ठलनामाचा जयघोष झाला. रिंगण सोहळा यावर्षीही वारकर्यांसाठी वारीचा आनंद द्विगुणीत करणारा ठरला. माऊलींचा पालखी सोहळा शुक्रवारी लोणंदनगरीतील आपला मुक्काम आटोपून दुपारी तरडगाव नगरीकडे मार्गस्थ झाला. या सोहळ्याला लोणंदनगरीने भक्तिभावाने निरोप दिल्यानंतर तरडगाववासीयांनी त्याचे स्वागत केले.
तान्ह्या बाळापासून ते नव्वदी पार असलेले माऊली रिंगण सोहळ्याचा आनंद आपल्या डोळ्यात टिपण्यात आतुर झाले होते. अखेर माऊलींची पालखी तरडगावपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या चांदोबाचा लिंब याठिकाणी पोहोचली. चोपदारांनी उभे रिंगण सोहळ्याच्या जागेची पाहणी केली. सोहळ्यातील सर्व दिंड्यांतील वारकरी रस्त्याच्या मध्ये एकमेकांसमोर दोन रांगांमध्ये उभे राहात ‘माऊली माऊली... ग्यानबा तुकाराम’चा जयघोष सुरू करत रिंगणाची महती दाखवून दिली.
माऊलींच्या पालखीसोबत दोन अश्व - एकावर स्वतः माऊली तर दुसरे अश्व शितोळे सरकारांचा ज्यावर चोपदार हातात भगवी पताका घेऊन बसलेले. सर्वांच्या नजरा चोपदार दंड उंचावून इशारा कधी देत आहेत याकडे लागलेल्या. अखेर चोपदारांनी दंड उंचावून रिंगण सुरू झाल्याचा इशारा दिला. दोन्ही अश्व तुफान वेगाने रथापासून पुढे दुतर्फा उभ्या असलेल्या वारकर्यांच्या मानवी साखळीतील शेवटच्या दिंडीपर्यंत पोहोचले आणि पुन्हा त्याच वेगाने परत माऊलींच्या चांदीच्या रथापर्यंत पोहोचले. अश्वांच्या टापांचा आवाज टाळ-मृदंगाच्या आवाजात आपलेही अस्तित्व तेवढ्याच दिमाखात सिद्ध करत होता.
शेवटी एकच गर्दी उसळली ती अश्वांच्या टापाखालची माती आपल्या कपाळी लावण्यासाठी. माऊलींचे अश्व ज्या मार्गावरून धावत गेले त्या जागेवर फुगड्या, उंच उड्या मारून अखंड वारकर्यांनी रिंगण सोहळ्याचा आनंद साजरा केला. रथापुढे आल्यानंतर दोन्ही अश्वांना पेढ्याचा प्रसाद भरवला आणि चोपदारांनी चांदीचा राजदंड उंचावत रिंगण सोहळा पार पाडल्याचे संकेत देताच लाखो वैष्णव तरडगावच्या दिशेने मुक्कामासाठी मार्गस्थ झाले. केवळ आठ किलोमीटरचे सर्वांत छोटे अंतर असलेला हा टप्पा आहे.
वारकर्यांचा उत्साह आणि टाळ मृदुंगाच्या टिपेला पोहोचलेल्या स्वरात रिंगण पार पडले. ‘माऊली... माऊली...’ आणि ‘ग्यानबा... तुकाराम...’च्या जयघोष वारकर्यांनी वारीतील पहिले उभे रिंगण पाहताना आध्यात्मिक मेजवानीचा आनंद लुटला. शुक्रवारी दुपारी महाआरती व नैवेद्य झाल्यावर माऊलींचा पालखी सोहळा तरडगावकडे निघाला. दुपारी दोनच्या सुमारास माऊलींच्या पालखीने खंडाळा तालुक्याचा निरोप घेऊन सरदेच्या ओढा ओलांडून फलटण तालुक्यात प्रवेश केला व तरडगावनगरीत मुक्कामासाठी विसावला.
रिंगण सोहळ्याने वारीचा आनंद द्विगुणित
भान हरपून खेळ खेळतो । दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा ॥
भक्तिने भारलेला रिंगण सोहळा । पाहावा याचि देही याचि डोळा ॥
आळंदी-पंढरपूर वारीतील विशेष महत्व असलेला रिंगण सोहळा या वर्षीही वारकर्यांसाठी वारीचा आनंद द्विगुणीत करणारा ठरला. एक नवी ऊर्जा यातून वारकर्यांना पुढील वारीसाठी मिळाली. रिंगण सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी झाली होती. डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी लाखो वैष्णवांची गर्दी याठिकाणी झाली असल्याने प्रशासनाने या ठिकाणी जय्यत तयारी केली होती. पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. रिंगण कालावधीत सोहळ्यातील वाहनांना वाहतुकीस अडथळा येऊ नये यासाठी महामार्गाचे रुंदीकरण करून स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.