पंढरपूर : श्री विठ्ठल मंदिर परिसरातील पश्चिमद्वार येथे झालेली भाविकांची गर्दी. Pudhari Photo
सोलापूर

Ashadhi Wari 2025 | पंढरपुरात 5 लाखांवर भाविक दाखल

वाखरीत पालखींचा अखेरचा मुक्काम, आज सायंकाळी पंढरीत दाखल होणार

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : आषाढी एकादशी सोहळ्यासाठी हरिनामाचा जयघोष करीत मजल दरमजल करत संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या वेशीवर दाखल झाला आहे. वाखरी (ता. पंढरपूर) येथे अवघ्या 7 किमी अंतरावर पालखी सोहळे दाखल झाल्याने भाविक भक्तांमध्ये विठ्ठलाच्या भेटीची आतुरता लागली आहे. त्यामुळे पंढरपुरातही भाविकांची गर्दी वाढू लागली असून 5 लाखांवर भाविक दाखल झाले आहेत. 65 एकर भरले आहे. तर दर्शन रांग मंदिरापासून थेट गोपाळपूर येथील स्वेरी कॉलेजपर्यंत पोहोचली आहे. यात्रेकरीता आलेल्या भाविकांना अत्यावश्यक सेवासुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनही अहोरात्र काम करत आहेत.

आषाढी यात्रेकरीता मंदिर समितीने दर्शन रांगेत 12 तर गोपाळपूर रोड दर्शन रांगेत 2 जर्मन हँगर शेड उभारले आहेत. दर्शन रांगेत बॅरेकेडींग करून त्यावर ताडपत्री शेड, जादा पत्राशेडची निर्मिती, आपत्कालिन गेट, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, बसण्याची सुविधा, लाईव्ह दर्शन, कूलर-फॅन, मिनरल वॉटर, चहा वाटप करण्यात आले आहे. तसेच 150 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची करडी नजर ठेवण्यात येत आहे. तर शहरातही 150 हून अधिक सीसीटीव्हीव्दारे नजर ठेवली जात आहे. दर्शन रांगेत दोन लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी दर्शन रांग गोपाळपूरच्या पुढे रांजणी रोडवर पोहोचली आहे.

आरोग्य विभागाच्यावतीने भाविकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. ठिकठिकाणी आरोग्य शिबिर सुरू करण्यात आली आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिका प्राथमिक उपचार केंद्रातून सेवा देण्याचे काम सुरू आहे. तर चंद्रभागा नदीपात्रात स्नानासाठी येणार्‍या भाविकांच्या जीविताची काळजी घेण्यासाठी जीवरक्षक बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. पालखी सोहळे पंढरपूरच्या वेशीवर येऊन थांबले असले तरी पंढरपुरात दर्शनासाठी लाखो भाविक दाखल झाले आहेत. मंदिर परिसर, दर्शन रांग, 65 एकर, उपनगरीय भाग भाविकांनी फुलून गेला आहे. आषाढी यात्रेकरीता राज्य परिवहन महामंडळाने 5500 जादा बसेसचे नियोजन केले आहे. तसेच ज्याठिकाणी 40 प्रवाशी एकत्रित येतील, तेथून बससेवा देण्याचे धोरण ठेवले आहे. तसेच विविध योजनांचा लाभदेखील भाविकांना देण्यात येत आहे. याकरीता हजारो कर्मचारी कार्यरत आहेत.

1500 सफाई कर्मचार्‍यांद्वारे स्वच्छता

शहरात एकूण 65 हातपंप व मंदिर परिसरातील 12 विद्युत पंपाद्वारे यात्रेकरुंना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच यात्रा कालावधीत पिण्याचे पाणी किमान 150 टँकरद्वारे संपूर्ण शहरात विशेषतः भक्तीसागर, वाळवंट पालखी तळ, पत्राशेड, ज्याठिकाणी मठांची संख्या जास्त आहे, त्याठिकाणी पाणी पुरविण्यात येणार आहे. यात्रा कालावधीमध्ये शहरात स्वच्छता रहावी म्हणून नगरपरिषदेच्यावतीने 1500 सफाई कर्मचार्‍यांद्वारे शहरात व उपनगरात स्वच्छता करण्यात येत आहे. तसेच 41 घंटागाडीद्वारेही कचरा गोळा करण्याचे काम यात्रा कालावधीत अहोरात्र चालू राहणार आहे. दररोज 100 ते 120 टन कचरा उचलण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT