सातारा : सातार्यात मोबाईल शॉपी दुकानातून 17 हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरणार्या महिलेला शहर पोलिसांनी अटक केली. हात चलाखीने व ओढणीच्या सहाय्याने मोबाईल लंपास केल्याचे सीसीटीव्हीमुळे समोर आले. ही घटना दि. 21 जून रोजी एसटी स्टॅन्ड परिसरात घडली होती.
माधवी काशीराम राठोड (वय 52, रा. चिमणगाव, ता. कोरेगाव, मूळ रा.कर्नाटक) असे अटक केलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. अधिक माहिती अशी, मोबाईल खरेदी व मोबाईल पाहण्याच्या बहाण्याने संशयित महिला सातारा बसस्थानक परिसरात मोबाईल दुकानात गेली. तेथे गर्दीचा गैरफायदा घेवून महिलेने गळ्यामध्ये ओढणी व स्कार्फच्या माध्यमातून हातचलाखीने डिस्प्लेवर ठेवलेला मोबाईल अलगद उचलला.
मोबाईल चोरी केल्यानंतर महिला मोबाईल शॉपी दुकानातून निघून गेली. यानंतर मोबाईल शॉपीमधील मोबाईलची मोजदाद सुरु असताना एक मोबाईल कमी असल्याचे दुकान चालकाच्या लक्षात आले. दुकानदाराने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये महिलेने मोबाईल चोरल्याचे स्पष्ट दिसले. यामुळे दुकान चालक आकाश ललित जैन (रा. भवानी पेठ, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने (डीबी) तपासाला सुरुवात केली.
मोबाईल चोरणारी महिला कोरेगावमध्ये सध्या वास्तव्य करत असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये तिने चोरीची कबुली देवून पोलिसांना मोबाईल परत दिला. पोनि राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्याम काळे, फौजदार सुधीर मोरे, पोलिस सुजीत भोसले, निलेश जाधव, निलेश यादव, विक्रम माने, पंकज मोहिते, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले, सुहास कदम यांनी कारवाईत सहभाग घेतला.
मोबाईल शॉपीमधील दुकानामध्ये सीसीटीव्हीमधील फुटेज पोलिसांनी पाहिल्यानंतर ती सराईत असल्याचे स्पष्ट झाले. जुन्या गुन्ह्यांची माहिती घेतल्यानंतर पोवई नाक्यावरील सराफ दुकानातही याच महिलेने सोने चोरी केली असल्याने ती रेकॉर्डवर असल्याचे पोलिसांनी ओळखले. महिला चोरी केल्यानंतर कर्नाटकला जाते. यामुळे तिला शोधायचे कसे? असा सवाल पोलिसांसमोर उभा राहिला होता. अखेर गोपनीय माहितीद्वारे महिला कोरेगाव येथे असल्याचे समजल्यानंतर तिच्यावर कारवाई करण्यात आली.