मेढा : सुकन्या व बचत खात्यावर पैसे न भरता अकरा खातेदारांच्या पासबुकवर पैसे भरल्याची खोटी नोंद करून 6 लाख 26 हजार 710 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वालुथच्या डाकपालावर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय गणपत चव्हाण असे गुन्हा दाखल झालेल्या डाकपालाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 फेब्रुवारी 2019 ते दि. 26 मार्च 2024 या कालावधीमध्ये डाकघर कार्यालय शाखा वालुथ येथे फसवणुकीचा प्रकार घडला आहे. डाकपाल संजय चव्हाण याने पदाचा गैरफायदा घेत बचत खाते,सुकन्या खाते, मुदत ठेव या खात्यामध्ये भरण्यासाठी 11 खातेदार यांनी विश्वासाने दिलेले पैसे हडपले आहेत. त्याने सुकन्या व बचत खात्यावर पैसे न भरता केवळ खातेदारांच्या पासबुकवर पैसे भरल्याची खोटी नोंद केली. मुदत ठेव खाते उघडण्याकरता पैसे स्वीकारून खातेदारांना पोस्टाचे बनावट पुस्तक तयार करून दिले. खाते उघडल्याचे दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले. 6 लाख 26 हजार 710 रूपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी चौकशी सुरू असताना त्याने अपहारील रक्कमेपैकी 3 लाख रुपये रक्कम शासकीय खात्यात भरली. उर्वरीत 3,26710 रुपये भरण्यास टाळाटाळ करत आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार एस. आर. दिघे. करत आहेत.