सातारा : सातारा शहरातील ज्येष्ठ कर सल्लागार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते अरुण रामकृष्ण गोडबोले (वय 82) यांचे मंगळवार दि. 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 च्या सुमारास चिंतामणी नर्सिंग होम येथे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे आर्थिक, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील एक मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले आहे.
अरुण गोडबोले यांची चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व म्हणून समाजात ओळख होती. रा. ना. गोडबोले ट्रस्टच्या माध्यमातून ‘सातारा भूषण’ पुरस्कार देणारे, शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणारे, खिंडीतील गणपती देवस्थान ट्रस्टचे आणि समर्थ सेवा मंडळाचे ट्रस्टी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, धार्मिक, चित्रपटसृष्टी, लेखन, पर्यटन, कला, क्रीडा, विज्ञान, बँकिंग तसेच कर सल्लागार या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी आपला वेगळा ठसा कायमच उमटवला होता. दि युनायटेड वेस्टर्न बँक, आयुर्वेदिय अर्कशाळा, सज्जनगड येथील समर्थ सेवा मंडळ, अंत्यसंस्कार सहायक मंडळ अशा अनेक संस्थांमधून त्यांनी सामाजिक कार्य केले.
चित्रपट निर्माता म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. कविता, प्रवास वर्णन, ललित, संत साहित्य अशा प्रकारचे प्रसिध्द साहित्य त्यांनी निर्माण केले आहे. त्यांनी आपल्या कौशिक प्रकाशनच्या माध्यमातून अनेक पुस्तके प्रकाशित करुन लिहित्या हातांना बळ दिले होते. अरुण गोडबोले यांच्यासारखे विद्वान व्यक्तिमत्व हरपल्यामुळे सातारा शहराचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात बंधू अशोक गोडबोले, माजी नगराध्यक्ष डॉ. अच्युत गोडबोले, पत्नी अनुपमा, मुलगा उदयन, सून संजीवनी, मुलगी डॉ. गौरी ताम्हणकर, जावई डॉ. हेमंत ताम्हणकर, पुतणे प्रद्युम्न व डॉ. चैतन्य, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अरुण गोडबोले यांची अंत्ययात्रा बुधवार दि. 15 रोजी सकाळी 10 वाजता शनिवार पेठ, सातारा येथील राहत्या घरापासून निघणार आहे.