सातारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त जिल्ह्यात सर्वत्र विविध सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी व नागरिकांनी अभिवादन केले. सातार्‍यातही शाहू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी अभिवादन केले.  pudhari photo
सातारा

शिवाजी महाराजांपेक्षा गव्हर्नर मोठा का?

खा. उदयनराजे : राजभवनातच शासनाने शिवरायांचे स्मारक करावे

पुढारी वृत्तसेवा

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निवडण्यात आलेली अरबी समुद्रातील जागा नैसर्गिकद़ृष्ट्या योग्य नाही. मुंबईतील राजभवनाची 48 एकर जागा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा गव्हर्नर मोठा आहे का? त्यामुळे गव्हर्नरच्या जागेपैकी 40 एकर जागा स्मारकासाठी उपलब्ध करून शिवरायांच्या पराक्रमाला साजेसे असे शिवस्मारक शासनाने उभे केले पाहिजे, अशी मागणी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून उदयनराजेंनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे, ज्येष्ठ नेते अण्णा वायदंडे, आप्पा तुपे उपस्थित होते.

खा. उदयनराजे म्हणाले, काँग्रेस आणि शिवसेना या दोघांकडेही सरकार असताना त्यांनीच शिवस्मारकाचा प्रश्न मार्गी लावायला पाहिजे होता, पण तसं झालं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी अरबी समुद्रातील निवडलेली जागा ही निसर्गाच्या द़ृष्टीने योग्य नाही. मुंबईसारख्या ठिकाणी राज्यपालांच्या नावावर 48 एकर जमीन उपलब्ध आहे. या जागेवरच शिवाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक झाले तर ते योग्य ठरेल. स्मारकासाठी यातील 40 एकर जागा आरक्षित करण्याची मागणी मी शासनाकडे केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा आदर्श घेऊन आपण आपल्या विचारात व्यापकता आणत नाही, तोपर्यंत देशाची प्रगती शक्य नाही. समाज घडवण्यासाठी महात्मा फुले, लहुजी वस्ताद यांचे योगदान मोठे आहे. परंतु छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले यांचे स्त्री शिक्षणातील योगदान सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे. त्यांचाच आदर्श घेऊन महात्मा फुलेंनी देखील स्त्री शिक्षणाचे मुहूर्तमेढ रोवली, असेही ते म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी निळा शर्ट परिधान केला होता. याबाबत विचारले असता उदयनराजे म्हणाले, इंद्रधनुष्यामध्ये सात रंग असतात. त्यातला निळा रंग मला नेहमीच आवडतो. मनुष्य हा एकमेव धर्म आहे. जात-पात करणार्‍यांना मनुष्यधर्म कसा लक्षात येईल? जातिवाद थांबला नाही तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही, असेही उदयनराजेंनी सांगितले.

संगममाहुली येथील महाराणी ताराराणीसाहेब यांच्या समाधीची दूरवस्था झाली आहे, याबाबत विचारले असता या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी लवकरच मीटिंग लावली जाईल. या समाधीच्या कामासाठी जो काही निधी लागेल, तो केंद्रातून प्राप्त करून घेऊ, असे देखील उदयनराजे म्हणाले.

डॉ. बाबासाहेबांच्या आठवणी जपण्यासाठी प्रयत्नशील

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण सातार्‍यातील राजवाड्यात झाले, याचा मला विशेष अभिमान आहे. काही लोकांनी कितीही डांगोरा पिटला तरी संविधानाला धोका निर्माण होणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सातार्‍यातील ज्या घरामध्ये राहत होते. ते घर लवकरच शासनाच्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या आठवणी जपण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न करणार आहे. सातार्‍यातील राजवाड्याचेही संगोपन व्हावे, यासाठी हेरिटेज ऑर्किऑलॉजिकल विभागाशी सातत्याने पत्रव्यवहार सुरू आहे. अशा वास्तू पुन्हा बांधून होणार नाहीत, यासाठी शासनाने पाऊले उचलावीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT