सातारा : दिपोत्सवाची खरी सांगता तुलसी विवाहाने होते. कार्तिक शुक्ल पक्षातील बारशीला घरोघरी तुळसी विवाहाचे बार उडणार असल्याने जनजीवनाला असलेली तुळसी विवाहाची उत्कटता संपणार आहे. त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत सोयीनुसार हा सोहळा पार पडणार असल्याने घरोघरी तुलसीच्या विवाहच्या तयारीला वेग आला आहे. या सोहळ्यासाठी ऊसाचे मंडप सजणार असून मंगलाष्टकांचे सूर गुुंजणार आहेत. या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतही तुलसी विवाहाचा माहोल निर्माण झाला असून पूजासाहित्याची रेलचेल वाढली आहे.
सर्वसाधारणपणे दिवाळी संपली की, तुलसी विवाहाचे वेध लागतात. जुन्या जानकारांच्यामते वसुबारसेपासून सुरु झालेली दिवाळी तुलसी विवाहापर्यंत असते. त्यामुळे तुलसी विवाहानेच खर्या अर्थाने दीपोत्सवाची सांगता होणार आहे. हिंदू पंचांगानुसार, तुलसी विवाह दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या बाराव्या दिवशी केला जातो. यावर्षी रविवार दि.2 नोव्हेंबर रोजी घरोघरी तुलसीच्या लग्नाचे बार उडणार आहेत.
त्यामुळे घरोघरी तुलसीच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. तुलसी वृंदावनाच्या रंगरंगोटीपासून विवाहासाठी भटजी बुक करण्यापर्यंत सर्व तयारी केली जात आहे. वर्हाडी मंडळींसाठी प्रसादापासून साग्रसंगीत जेवणावळीपर्यंत नियोजन सुरु आहे. काही घरांमध्ये पै-पाहुणे नसले तरी शेजारी, मित्रमंडळींना हमखास तुळशीच्या लग्नाला बोलावले जाते. त्यामुळे तयारीही मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.बाजारपेठेत तुलसी विवाहासाठी लागणार्या वस्तू व पूजा साहित्याची रेलचेल वाढली आहे. मणिमंगळसूत्र, फणी, कापसाची माळ, बांगड्या श्रीकृष्णासाठी मुकुट, कपडे, जानवे, पूजेचे पाट, रुमाल आदि साहित्याने दुकाने गजबजली आहेत. शनिवार रविवार सुट्टी असल्याने तयारीसाठी सोयीचे होणार असल्याने तुलसी विवाह सोहळ्याचा आनंद आणखी व्दिगुणित झाला आहे.
दम्यान, तुलसी विवाहासाठी उसाचा मंडप घालण्याची परंपरा असल्याने बाजारपेठेत ऊस, देशी बोरं, चिंच आवळ्याची आवक वाढली आहे. त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तलसी विवाह लावले जात असल्याने या कालावधीत दारी उसाचा मंडप सजणार असून मंगलष्टाकांचे सूर कानी पडणार आहेत. यंदाच्या लग्नसराईला प्रारंभ होत असल्याने उपवर वधूवरांसह पालकांमध्ये उत्साह संचारला आहे.
कार्तिक शुक्ल द्वादशी म्हणजे रविवार दि.2 नोव्हेंबर रोजी दुपारपासून सुरु होत आहे. यावर्षी तुलसी विवाहाची तिथी दोन दिवसामध्ये विभागून आल्याने रविवारी सायंकाळपासूनच विवाह सोहळे सुरु होत आहेत. मात्र पूजेसाठी सोमवारपासून शुभ असल्याने तेव्हापासून तुळशी विवाहाला प्रारंभ होणार आहे. हिंदू परंपरेनुसार त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह लावले जात असल्याने सलग चार दिवस गोरज मुहूर्तावर तुलसीच्या लग्नाचे बार उडणार असून चिमुकल्यांसह वर्हाडी मंडळींची लगबग सुरु राहणार आहे.