चाफळ : पाडळोशी (ता. पाटण) येथे भरवस्तीत बिबट्याने धुमाकूळ घालत पाळीव कुत्रा फस्त केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पाडळोशी येथील भरवस्तीत राहणारे बापूराव चव्हाण यांच्या घराशेजारी असलेल्या शेडमध्ये कुत्रा बांधलेला होता. रात्री उशिरा बिबट्याने शेडमध्ये घुसून कुत्र्यावर हल्ला चढवला व तो फस्त केला. ही घटना लक्षात आल्यानंतर परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांत भितीचे सावट पसरले आहे. उत्तर मांड धरण झाल्यानंतर परिसरातील उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे जंगली प्राणी डोंगरातील आसरा सोडून उसाच्या शेतांमध्ये वस्ती करत आहेत. परिणामी पाडळोशीसह परिसरातील अनेक गावांमध्ये दिवसा देखील बिबटे, रानडुकरे, हरिण यांचा वावर वारंवार दिसून येतो. गेल्या काही दिवसांत पाडळोशी परिसरात बिबट्याने अनेक शेळ्या व पाळीव कुत्र्यांना फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत.
गुरुवारी भरवस्तीतच हल्ला झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मानवावर हल्ला होण्या आधीच वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून वनविभागाने तातडीने तपासणी सुरू केली आहे.