सातारा : भारतात समतेचा विचार अनेक वर्षांपासून मांडला जात आहे. परंतु खर्याअर्थाने समतेला कायद्याचा आधार देऊन सर्व भारतीयांना समान पातळीवर आणण्याचे ऐतिहासिक काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून पूर्ण केले. आज काही वर्ण वर्चस्ववादी लोक ही घटनाच उद्ध्वस्त करण्याचे काम करत आहेत. त्यांना रोखण्यासाठी सर्वांनी एकजुटीने लढा उभा केला पाहिजे, असे मत प्रदेश काँग्रेसचे सचिव राजेंद्र शेलार यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सातारा जिल्हा काँग्रेस भवन येथे डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस नरेश देसाई, बाबासाहेब कदम, रफिक बागवान, जगन्नाथ कुंभार, सातारा शहराध्यक्षा रजनी पवार, अॅड. दत्ता धनावडे व पदाधिकारी उपस्थित होते.
राजेंद्र शेलार म्हणाले, संविधानावर आधारित कायद्याचे राज्य स्थापन करण्यात काँग्रेस पक्षाची मोठी भूमिका होती. सध्या डॉ. बाबासाहेबांच्या घटनेवर चोहोबाजूंनी हल्ले होत आहेत. देशात कायद्याचे राज्य राहिलेले नाही. त्यासाठी समाजातील सर्व लोकांनी एकत्रित लढा उभा केला पाहिजे. यावेळी संदीप माने, आरबाज शेख, संभाजी उतेकर, अन्वर पाशा खान, सुभाष कांबळे, अमोल शिंदे, प्राची ताकतोडे, सौ. माधवी वर्पे, सुषमा राजेघोरपडे, विजय मोरे, आनंदराव जाधव उपस्थित होते.