शरद पवार 
सातारा

अजितदादांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला

पुढारी वृत्तसेवा

सातारा : महायुतीसोबत सत्तेत सामील झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष व अजितदादांचे कट्टर समर्थक असलेल्या अमित कदम यांनी रविवारी सातार्‍यात खा. शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अमित कदम यांनी पवारांकडे सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली.

ना. अजित पवार यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाची दोन शकले पडली. सातारा जिल्ह्यात पक्षाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदाची जबाबदारी स्व. आमदार जी. जी. कदम यांचे चिरंजीव अमित कदम यांच्यावर सोपवली. ही जबाबदारी सांभाळत असताना पक्षाची चांगली मोट बांधण्यासाठी अमित कदम यांनी अल्प काळात चांगले प्रयत्न केले. नुकताच मेढा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांनी सातारा-जावली विधानसभा मतदारसंघासाठी लढणार असल्याचे जाहीर केले होते. दुसर्‍याच दिवशी कदम यांनी थोरल्या पवारांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याबाबत पत्रकारांशी बोलताना अमित कदम म्हणाले, खा. शरद पवार यांच्या विचारांशी निगडित राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम केले. पक्षाची विचारधारा कधीही सोडली नाही. त्याच अनुषंगाने मेढ्यात मेळावा घेतला. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी केली आहे. संधी मिळेल तिथून उभे राहायचे आहे, असे मी खा. शरद पवारांना सांगितले. मला संधी दिली तर मूळचा राष्ट्रवादीचा हा मतदारसंघ पुन्हा अभेद्य ठेवण्याचे काम मी करेन. तुमचा हा निर्णय ना. अजित पवारांना पटेल का? असे विचारले असता कदम म्हणाले, राजकीय भूमिका स्पष्टपणे मांडली पाहिजे, या विचाराचा मी आहे. चिपळून येथे ना. अजित पवार यांना भेटूनही मी माझी भूमिका सांगितली आहे. राष्ट्रवादीने सुरुवातीपासूनच भाजपच्याविरोधात संघटन केले आहे. या संघटनेला बळ देण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, याबाबत ना. पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, पण माझ्या म्हणण्याला नकारही दिला नाही. माझे स्वच्छ मत मी ना. पवार यांच्यापुढे मांडले आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मला लढावेच लागणार आहे, असेही कदम यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT