शरद पवार File Photo
सातारा

पितृपक्ष संपताच थोरल्या पवारांकडून मुलाखती

पुढारी वृत्तसेवा

सातारा : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुकीची जोरदार रणनीती आखली गेली आहे. या पक्षाचे सर्वेसर्वा असलेल्या थोरल्या पवारांकडून पितृपक्ष संपताच विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या राज्यातील उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. सातारा जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघांतील एकूण 29 इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असून, त्यांच्या नजरा या मुलाखतींकडे लागल्या आहेत.

विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. जिल्ह्यात कराड दक्षिण वगळता इतर सर्वच मतदारसंघांत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून इच्छुकांची संख्या अधिक आहे. कराड दक्षिण मतदारसंघ हा मित्रपक्ष काँग्रेसला सोडून इतर सातही विधानसभा मतदारसंघांसाठी खा. शरद पवार गट इच्छुक असल्याचे समोर येत आहे. महाविकास आघाडीची बैठक दि. 29 किंवा 30 सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. सत्ताधारी महायुतीला शह देण्याची व्यूहरचना या बैठकीत रचली जाणार आहे. मात्र, सातारा जिल्ह्यावर खा. शरद पवार यांची पकड लक्षात घेता जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघात खा. पवारांच्या राष्ट्रवादीने जोरदार तयारी केलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये खा. शरद पवार यांचा गट सातार्‍यातील जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी आग्रही राहण्याची शक्यता आहे.

खा. पवारांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत जिल्ह्यातील तब्बल 29 उमेदवारांनी विविध मतदारसंघांतून उमेदवारीची मागणी केलेली आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या फलटण मतदारसंघामध्ये सर्वाधिक 13 इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केलेली आहे. त्याखालोखाल वाई मतदारसंघातून सात जणांनी उमेदवारीची मागणी केलेली आहे. माणमधून चार, सातारा-जावलीतून दोन, तर कोरेगावमधून आ. शशिकांत शिंदे, कराड उत्तरमधून आ. बाळासाहेब पाटील तसेच पाटणमधून सत्यजित पाटणकर यांनी उमेदवारीची मागणी केलेली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल. त्यामुळे पितृपक्ष संपताच दि. 2 किंवा 3 ऑक्टोबर रोजी राज्यातील इच्छूक उमेदवारांना मुंबईत बोलावून घेऊन मुलाखती घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील सूत्रांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT