सातारा/कण्हेर : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार कायम असल्याने कण्हेर, उरमोडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. त्यामुळे वेण्णा व कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कण्हेर धरणातून एकूण 2,920 क्युसेक पाण्याचा विसर्ग वेण्णा नदीत करण्यात आला आहे.
सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार कायम आहे. कण्हेर धरणात प्रती तास 4,335 क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने एकूण 72 टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे गुरुवारी दुपारी 1 वाजता धरणाच्या सांडव्यावरून चारीही दरवाज्यातून 2220 क्युसेक तर विद्युत ग्रह प्रकल्पातून 700 क्युसेक असे एकूण 2,920 क्युसेक पाण्याचा विसर्ग वेण्णा नदीत होत आहे. उरमोडी धरणातून 2 हजार 191 क्युसेक, मोरणा धरणातून 1 हजार 758 क्युसेक वांग मराठवाडी धरणातून 1 हजार 178 क्युसेक विसर्ग सुरु आहे. त्यामुळे वेण्णा, कृष्णा, कोयना नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
सध्या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. खटाव, माणसह कोरेगाव तालुक्यात काही ठिकाणी पेरण्यांची लगबग सुरू आहे. तर काही ठिकाणी अडसाली ऊस लागणीची कामे युध्दपातळीवर सुरू आहेत. सातारा जिल्ह्यात गुरूवारी सकाळी 10.30 पर्यंत सातारा 15.6 मि.मी., जावली 44.3 मि.मी., पाटण 26.7 मि.मी., कराड 9.3 मि.मी., कोरेगाव 5.7 मि.मी., खटाव 2.5 मि.मी., माण 0.7 मि.मी, फलटण 0.7 मि.मी., खंडाळा 6.6.मि.मी., वाई 16 मि.मी., महाबळेश्वर 71.7 मि.मी. पावसाची नोंद झाली.