वेलंग : वाई तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साठून पिकांचे नुकसान होत आहे. भाताच्या तरवांची त्याचबरोबर सोयाबीन व तूरीलाही पावसाचा फटका बसला आहे. या पिकांची अपेक्षित उगवण न झाल्याने बळीराजावर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
मे महिन्यात वळवाच्या पावसाने तडाखा दिला. त्यानंतर जून महिना उजाडल्यानंतरही पावसाचा जोर कायम आहे. वाईच्या पश्चिम भागात या पावसातही अनेकांनी पेरणी केली आहे. या भागात भाताचे मोठया प्रमाणात उत्पादन होते. मात्र, पावसाची संततधार कायम असल्याने भातांच्या तरव्याची उगवण कमी झाले आहे. तर शेतात पाणी साठल्याने सोयाबीन व तूरीचीही तशीच परिस्थिती आहे. जमिनीचा पोत भिजट राहिल्याने बियाण्यांची उगवण खोळंबली आहे. काही ठिकाणी पिकांची उगवण चांगली झाली आहे.
मात्र, तेथेही पक्षी व मोरांचा उपद्रव सुरू झाला आहे. पेरणी केलेली कोवळी रोपे मोडून टाकली जात आहेत. त्यामुळे शेतकर्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. सोयाबीनची पेरणी देखील काही भागांमध्ये वेळेवर झाली होती. मात्र उगवण न झाल्यामुळे तीही धोक्यात आली आहे. अजून योग्य उगवण न झाल्याने शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यातच बियाण्यांचा तुटवडा व वाढती मजुरीनेही शेतकरी बेजार झाला आहे. शेतकर्यांची आर्थिक अडचण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
बियाण्यांसाठी कृषी विभागामार्फत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून होती. मात्र, त्यानंतर आजपर्यंत शेतकर्यांना भात व सोयबीन बियाणांचे वाटप झालेले नाही. त्यामुळे ही बियाणे कधी मिळणार? यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे.सचिन मांनकुबरे, शेतकरी