सातारा : जिल्ह्याच्या पर्यटन विकास आणि प्रवाशांच्या जलद व सुरक्षित प्रवसाच्या स्वप्नांना आता नवे पंख मिळणार आहेत. वाई तालुक्यातील धोम धरणात ‘सी प्लेन’ सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. केंद्र सरकारच्या ‘उडान 5.5’ या योजनेतर्गत ही महत्त्वाकांक्षी योजना राबवली जात असून यामुळे पर्यटन, रोजगार व स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा ‘बूस्ट’ मिळणार आहे.
देशभरात दीडशेहून अधिक ठिकाणी ‘सी प्लेन’ व हेलिकॉप्टर सेवा सुरु करण्याचे नियोजन असून राज्यातील प्रमुख पर्यटन व जलाशय केंद्रांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर राज्यातील अंतर्गत पर्यटन अधिक सक्षम होणार आहे. दुर्गम भागांनाही हवाई प्रवासाच्या माध्यमातून पर्यटन नकाशावर आणण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे. धोम धरण हे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भव्य असा जलाशय आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या याठिकाणी चित्रपटांचे चित्रीकरण, बोटिंग, साहसी खेळांसाठी यापूर्वीच प्रसिद्ध आहे. आता ‘सी-प्लेन’ सेवा सुरू झाल्यानंतर हे ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील ‘टॉप टूरिस्ट डेस्टिनेशन’ होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
तसेच ते वाई, पाचगणी, महाबळेश्वर, कास पठार अशा ठिकाणांना जोडले जाईल. ‘सी प्लेन’ सेवा सुरळीत सुरू होण्यासाठी राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, पर्यटन विभाग आणि नागरी उड्डाण मंत्रालय यांच्यात समन्वय आवश्यक आहे. प्रत्येक ठिकाणी जेटी, प्रवासी प्रतीक्षा क्षेत्र, सुरक्षाव्यवस्था, इंधन व देखभाल सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम करावे लागणार आहे. धोम धरणात ‘सी प्लेन’ सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव सातारा सिंचन मंडळाने राज्य शासनास पाठवला आहे. मात्र त्यावर झालेल्या निर्णयाबाबत अभियंत्यांना कोणतीही कल्पना नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, ‘सी प्लेन’ सेवा कोयना जलाशयात सुरू करण्याचा प्रस्ताव होता. मात्र त्याठिकाणी आता जलपर्यटन प्रकल्प मंजूर झाले असून त्याची कामे सुरू आहेत.
राज्यासह सातारा जिल्ह्यात सुरू होणारी ‘सी- प्लेन’ सेवा ही केवळ प्रवासाचे साधन नसून पर्यटन, रोजगार, विकास आणि आधुनिकतेची नवी दिशा दर्शवणारी योजना आहे. धोमपासून रत्नागिरीपर्यंतच्या जलाशयांमध्ये विमान उडताना पाहणे ही अनुभवाची नवी पर्वणी ठरणार आहे. राज्याच्या प्रगतीकडे झेपावणार्या या योजनेची यशस्वीपणे अंमलबजावणी झाली तर महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यात पर्यटनाचा खर्या अर्थाने ‘गतिमान’ विकास घडू शकतो, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
‘सी प्लेन’ म्हणजे जलाशयांवरून उड्डाण व लँडिंग करणारे विशेष हवाई विमान होय. या विमानांना धावपट्टीची गरज नसते. ती थेट धरणे, तलाव, समुद्रकिनार्यावरून उड्डाण करू शकतात. ही सेवा जिथे विमानतळ होऊ शकत नाही किंवा विमान उड्डाणास अडचणी येऊ शकतात अशा दुर्गम भागात पोहोचवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
‘उडे देश का आम आदमी’ योजनेची सुधारित आवृत्ती म्हणजे उडान 5.5 योजना आहे. या अंतर्गत कमी खर्चात अल्पदूरीतील प्रवासासाठी हवाई सेवा उपलब्ध करून देणे, हे योजनेचे उद्दिष्ट आहे. यासाठी केंद्र सरकारतर्फे विमान कंपन्यांना अनुदान, लँडिंग सुविधा व स्थानिक प्रशासनाची मदत दिली जाते.