Satara News: जिल्ह्यातील लाडक्या बहिणी धास्तावल्या File Photo
सातारा

Satara News: जिल्ह्यातील लाडक्या बहिणी धास्तावल्या

ई-केवायसीचा घाट : पतीचा ‘आधार’च निराधार करण्याची भीती

पुढारी वृत्तसेवा
मीना शिंदे

सातारा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जिल्ह्यात सुमारे 7 लाख लाभार्थी आहेत. मात्र सध्या या लाभार्थ्यांची छाननी करण्यासाठी पुन्हा ई-केवायसीचा घाट शासनाने घातला आहे. त्यासाठी विवाहितेला पतीचे तर मुलींना पित्याचे आधार जोडावे लागत आहे. पतीच्या उत्पन्नात वाढ झाल्यास त्या लाभार्थीचे नाव योजनेतून वगळले जाण्याची शक्यता आहे. शासनाच्या या युक्तीमुळे पतीचे आधारच महिलांना निराधार करणार असल्याने सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींमध्ये धास्ती वाढली आहे.

गतवर्षांपासून राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. सुरुवातीला सरसकट लाभ दिल्यानंतर टप्प्या-टप्प्याने छाननी करुन लाभार्थींची संख्या कमी केली आहे. चारचाकी वाहन असलेल्या 14 हजार 868 महिलांची नावे वगळण्यात आली असून 270 महिलांना स्वत:हूनच योजनेचा लाभ सोडला आहे. सध्या जिल्ह्यात या योजनेचे सुमारे 7 लाख लाभार्थी असून आता पुन्हा शासनाने ई-केवायसीचा घाट घातला आहे. ही ई-केवायसी करताना महिलेने पतीचे व अविवाहित मुलींनी पित्याचे आधार नंबर जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आधार नंबरवरुन पतीचा आर्थिक सातबारा शासनासमोर येणार आहे.

संबंधित महिलेचे उत्पन्न स्थिर असले तरी जर तिच्या पतीचे उत्पन्न वाढलेे असल्यास योजनेतून वगळले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पतीचा आधार नंबरच त्यांना या योजनेपासून वंचित ठेवण्यास सबळ पुरावा ठरणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये धास्ती वाढली आहे.

दरम्यान, या ई केवायसीसाठी दोन महिन्यांचीच मुदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र या छाननीमुळे कमी आर्थिक गटातील गरजू महिलांना हा लाभ कायम राहणार आहे. त्यामुळे बोगस लाभार्थ्यांनाच ही चिंता सतावू लागली आहे.

सर्व्हर डाऊनमुळे ई-सेवा केंद्रांमध्ये फेर्‍या...

ई-केवायसी बंधनकारक असल्याने राज्यभरातून त्यावर काम सुरु आहे. एकाचवेळी अनेक वापरकर्ते कार्यरत राहिल्याने संकेतस्थळावर लोड येवून सर्व्हर डाऊन होत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या ई-सेवा केंद्रांमध्ये फेर्‍या वाढल्या आहेत. महिला व बाल विकास विभागाने सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. परंतू ज्यांचे पती किंवा पिता हयात नाहीत, त्या लाभार्थ्यांपुढे मोठा पेच पडला आहे. कारण आधारला जो मोबाईल लिंक आहे, त्यावरच ओटीपी येत असून ओटीपी टाकल्यावरच पुढील प्रक्रिया पार पडत आहे. त्यामुळे ई-केवायसी म्हणजे कटकट झाल्याने लाडक्या बहिणींमधून नाराजी व्यक्त होत आहे.

आधीच महिलांना मिळणारी रक्कम तुटपुंजी आहे. त्यातच आता नव्याने ई-केवायसी करताना तांत्रिक अडचणींमुळे अडचणी येत आहेत. सणासुदीच्या तोंडावर ई-सेवा केंद्रात ताटकळत थांबावे लागत आहे. तसेच बँक खात्यासाठीदेखील फेर केवायसी करावी लागत आहे. त्यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. एवढे करुनही दिवाळीपर्यंत पैसे येतील, याची खात्री कोणतीच शासकीय यंत्रणा देत नाही.
-योजना लाभार्थी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT