सातारा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्ता मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बॉम्बे रेस्टॉरंट चौक, विसावा नाका, जिल्हा परिषद चौक, पोवई नाका, नेताजी सुभाषचंद्र बोस चौकासह ठिकठिकाणी लावलेले 42 फ्लेक्स विनापरवाना असल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे सातारा नगरपालिकेने शिवसेनेच्या (शिंदे गट) चमकोगिरी करणाऱ्यांना 1 लाख 68 हजार रुपये दंडाच्या नोटिसा धाडल्या आहेत. तसेच दै. ‘पुढारी’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने अनधिकृत फ्लेक्स काढण्यासाठी गुरुवारी मोहीम राबवली.
साताऱ्यातील काही भागात नगरपालिकेने झोन तयार करून फ्लेक्स लावण्यास मनाई केली आहे. नागरिकांच्या तक्रारी व नागरी समस्या विचारात घेऊन विनापरवाना फ्लेक्स लावून वाहतुकीला अडचण व नागरिकांची गैरसोय करणाऱ्या फ्लेक्सवर नगरपालिकेकडून यापूर्वी कारवाई झाली आहे. असे असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या अतिउत्साही कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी बेकायदा फ्लेक्स लावून नियमांची पायमल्ली केल्याचे उघडकीस आले.
बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते पोवई नाका या महामार्गावरील विसावा नाका, जिल्हा परिषद चौकासह मार्गावर ठिकठिकाणी विनापरवाना बॅनरबाजी करण्यात आली होती. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी तसेच तहसीलदारांची तक्षशिला व नालंदा ही निवासस्थानेही या बॅनरबाजीच्या कचाट्यातून सुटली नाहीत. त्यामुळे उबग आणणारे, अत्यंत बकालपणा आणणारे चित्र या महामार्गावर निर्माण झाले होते. अशीच अवस्था पोवई नाका-बसस्थानक ते नेताजी सुभाषचंद्र बोस चौक या परिसरातही झाली होती. मोती चौक, करंजे नाका येथेही अनाधिकृत फ्लेक्स लावल्याचे दिसून आले.
याबाबत नागरिकांच्या तसेच सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या तक्रारी आल्यानंतर याप्रकरणी दै. ‘पुढारी’ने गुरूवारच्या अंकात ‘साताऱ्यात फलकबंदीला शिवसेनेचा ठेंगा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताची गंभीर दखल घेऊन सातारा पालिका प्रशासनाने कारवाई केली. अतिक्रमण हटाव विभागाने शिवसेनेच्या (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांना 1 लाख 68 हजार रूपये भरण्याची नोटीस काढली आहे. या नोटीशीत म्हटले आहे, सातारा पालिकेच्या हद्दीमध्ये विनापरवाना बॅनर्स लावल्याने शहराचे विद्रुपीकरण केले आहे. त्यामुळे त्याची जागा, वापर फी, जाहिरात फी, वस्तू व सेवाकर 24 तासांच्या आत नगरपालिकेच्या लेखा विभागात भरणार करावी. अन्यथा कायद्यानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. नोटीस काढलेल्यांमध्ये रणजितसिंह भोसले, संभाजी शिवाजी पाटील, अंकुशबाबा कदम युवा फाऊंडेशन, अंकुशबाबा कदम, शरद कणसे, संदीप पवार आदिंचा समावेश आहे. सातारा पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने केलेल्या पाहणीत 42 फ्लेक्स बेकायदेशीर आढळून आले असून फक्त 12 फ्लेक्सची परवानगी घेण्यात आली होती.
त्यानंतरही शहराच्या उर्वरित भागात लावलेल्या फ्लेक्सची माहिती घेऊन नोटीस काढण्याचे काम सुरू होते. सातारा पालिकेने कारवाईचा दंडुका उगारल्यावर शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी अतिक्रमण हटाव विभागात धाव घेऊन पुन्हा परवानगी घेण्यासाठी धडपड केली. तसेच कारवाईच्या दणक्यानंतर काढलेल्या नोटीशीप्रमाणे रकमा भरण्याची कार्यकर्त्यांची लगबग लेखा विभागात सुरू होती. सातारा पालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख प्रशांत निकम यांच्या सुचनेनुसार गुरूवारी सकाळपासून अनाधिकृत फ्लेक्स हटवण्यासाठी मोहीम सुरू झाली. 10 कर्मचाऱ्यांनी टिपरच्या साहाय्याने अनाधिकृत फ्लेक्स ताब्यात घेतले. या कारवाईने शिवसेनेची पुरती नाचक्की झाली.