सातारा : सातारा शहरात पाईंट टू पॉईंट शेअर ए रिक्षा सेवा सुरु करण्यास प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. त्यासाठी दरपत्रकही निश्चित केले आहे. या दरानुसारच भाडे आकारणी करावी अन्यथा रिक्षावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी दिली.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण सातारा यांच्या झालेल्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत मार्ग व दरपत्रकही निश्चित करण्यात आले. सातारा बसस्थानक ते सातारा रेल्वे स्टेशन प्रति प्रवाशांसाठी 65 रुपये, सातारा रेल्वे स्टेशन ते सातारा बसस्थानक 73 रुपये, सातारा रेल्वे स्टेशन ते पोवई नाका 58 रुपये, पोवई नाका ते सातारा रेल्वे स्टेशन 58 रुपये, सातारा रेल्वे स्टेशन ते बॉम्बे रेस्टारंट चौक 41 रुपये, बॉम्बे रेस्टारंट चौक ते सातारा रेल्वे स्टेशन 41 रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त जे रिक्षा चालक जादा भाड्याची मागणी करतील त्यांच्याबाबत तक्रार केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.