तासवडे टोलनाका : वहागाव, ता. कराड येथे आशियाई महामार्ग उड्डाणपुलाच्या कामानिमित्ताने सेवा रस्त्यावर वळवला आहे. या सेवा रस्त्यावरून स्थानिक नागरिक, शेतकरी, कामगार, शेतमजूर ये-जा करत असतात. दरम्यान, सेवा रस्त्याला गतिरोधक नसल्यामुळे दोन दिवसांपासून महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावरून सुसाट वेगाने सुरू आहे. त्यामुळे सेवा रस्त्यावरून ये-जा करणार्या स्थानिकांना जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागत आहे. त्यामुळे स्थानिकांची सुरक्षा रामभरोसे झाली आहे.
सातारा ते कागल दरम्यान, आशियाई महामार्गाचे दोन वर्षांपासून सहापदरी रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यामध्ये महामार्ग व महामार्ग लगतच्या सेवा रस्त्याचे रुंदीकरणाचे काम करण्यात येत आहे. तसेच महामार्गावरील गावच्या ठिकाणी असणार्या उड्डाणपुलाचे रुंदीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी महामार्गावरील उड्डाणपुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. तर काही ठिकाणी महामार्गाचे रुंदीकरण रखडले असून अनेक दिवसांपासून ते काम अर्धवट आहे.
खोडशी, वनवासमाची या दरम्यान पूर्व बाजूच्या महामार्गावर मोरीवरील छोटा पूल बांधण्याचे काम सुरू आहे. परंतु हे काम गेल्या दीड वर्षांपासून आहे त्याच स्थितीत अर्धवट राहिले आहे. त्यामुळे महामार्गावरून व सेवा रस्त्यावरून प्रवास करताना या ठिकाणी वाहन चालकांना व स्थानिकांना कसरत करावी लागते.
दरम्यान, वहागाव या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावरुन वळवली आहे. दोन दिवसांपासून वाहतूक सेवा रस्त्यावरून सुरू आहे. परंतु या ठिकाणी सेवारस्त्याला कोणताही गतिरोधक नसल्यामुळे महामार्गावरून वाहने सेवा रस्त्यावर सुसाट धावत आहेत. स्थानिकांकडून सेवा रस्त्याचा वापर शेतामध्ये जाण्यासाठी होत असतो.
तसेच अनेकांची शेतजमीन व जनावरांचे शेडही या सेवा रस्त्याच्या पश्चिम बाजूला आहे. त्यामुळे शेतकर्यांना सेवारस्ता पार करताना दिव्यातून जावे लागत आहे. एसटी बस व खाजगी वाहनांची उड्डाणपूलाखालून वाहतूक सुरू असते. परंतु दोन दिवसांपासून उड्डाणपलाखालून वहागावमध्ये जाण्यासाठी सेवा रस्ता अत्यंत धोकादायक झाला आहे. त्यामुळे जर एखादी दुर्घटना किंवा अपघात घडला तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने वहागावच्या उड्डाणपुलाजवळ गतिरोधक करावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
महामार्ग रुंदीकरणाचे काम करणार्या कंपनीने वहागाव येथे वाहतूक सेवा रस्त्यावर वळवली आहे. परंतु या ठिकाणी कोणताही गतिरोधक केला नाही. यामुळे सेवा रस्त्यावरून वाहने सुसाट धावत आहे. परिणामी, शेतकरी, शाळकरी मुले, शेतमजूर यांना प्रवास करताना धोका निर्माण झाला आहे. वहागाव येथे उड्डाणपुलाजवळ गतिरोधक करणे गरजेचे आहे.- सचिन पवार, माजी उपसरपंच, वहागाव