कराड : पुणे-बंगळूर आशियाई महामार्गाच्या उड्डाणपुलाचे काम कराड, मलकापूर येथे सुरू आहे. या उड्डाणपुलाचे सेगमेंट बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, उड्डाणपुलाच्या खालून आठ पदरी रस्त्याचे काम व दोन्ही बाजूला बांधण्यात येणार्या सिमेंट काँक्रीट गटारचे काम अतिशय संथपणे सुरू आहे. गटरसाठी अनेक ठिकाणी रस्ता मध्येच उकरला असून, काही ठिकाणी सळी (ग्रील) उभी करून ठेवले असल्याने ते धोकादायक बनले आहे. त्याचा वाहनधारकांसह प्रवाशांना त्रास होत आहे.
पुणे-बंगळूर आशियाई महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. त्या अंतर्गतच कराड-मलकापूर दरम्यान सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बनवण्याचे काम सुरू आहे. या उड्डाणपुलाच्या कामाचा भाग म्हणून कोल्हापूर नाक्यावरती सेगमेंट बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी त्या पुलाखालून असणार्या आठ पदरी रस्त्याच्या कामाने अपेक्षित गती घेतल्याचे दिसून येत नाही. उड्डाणपुलाच्या खाली दोन्ही बाजूला चार पदरी रस्ता तयार केला जाणार आहे. या दोन्ही बाजूला दोन लेन सोडून मध्येच सिमेंट काँक्रिटीकरण गटरचे बांधकाम सुरू आहे. परंतु, हे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने व अनेक ठिकाणी काम अर्धवट अवस्थेत असल्याने ते प्रवासी वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे.
या साडेतीन किलोमीटर लांबीच्या रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी गटरच्या कामासाठी रस्ता उकरला आहे. तर काही ठिकाणी ग्रील बांधून उभे करून सोडले आहेत. काही ठिकाणी उंच रस्ता खोदल्यामुळे पुलाखालून रस्ता करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने उंचावरून जाणारा रस्ता खाली गटर बांधकामासाठी खोदलेल्या जागेवर ढासळत आहे. अशा विविध कारणाने हा रस्ता धोकादायक बनला आहे. तरी सेगमेंट पुलाबरोबरच महामार्गाच्या गटरचे कामही त्वरित पूर्ण करून उड्डाणपूला खालील रस्ताही लवकर पूर्ण करावा, अशी मागणी वाहनधारकांसह प्रवासी व परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सध्या कृष्णा हॉस्पिटलसमोर उड्डाणपुलाच्या खालून पिलरच्या दोन्ही बाजूला दोन-दोन लेनचा रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. या रस्त्यालगतच गटरचे बांधकाम करण्यासाठी मूळचा उंच रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी सुमारे सहा ते सात फूट रस्ता उकरला आहे. रस्ता खोदलेल्या ठिकाणी अनेक वेळेला बाजूचा रस्त्याची बाजू ढासळत आहे. तर काही ठिकाणी गटर बांधकामासाठी सळी लावून तसेच सोडण्यात आले आहे. या अर्धवट कामामुळे दिवसेंदिवस गटर बांधकामालगतचा रस्ता ढासळत असल्याने तो वाहतुकीला धोकादायक ठरत आहे. त्याच पद्धतीने ढेबेवाडी फाटा ते कोल्हापूर नाका यादरम्यान अनेक ठिकाणी गटर बांधकामासाठी रस्ता उकरला आहे. दोन्ही बाजूला रस्ता उतरला असून अर्धवट कामामुळे तो रस्ता धोकादायक बनला आहे.
कोल्हापूर बाजूकडून पुणे बाजूकडे जात असताना मलकापूर गावच्या हद्दीत कृष्णा हॉस्पिटलजवळ आल्यानंतर वाहन चालवताना अंगावर काटा येतो. कारण रस्त्यालगतची जमीन उकरण्यात आला असून तेथे गटरचे बांधकाम करण्यात येणार आहे. मात्र गत अनेक दिवसांपासून हे काम रखडले असून उकरलेला रस्ता ढासळत असून सुरू असलेला रस्ता दिवसेंदिवस अरुंद होत चालला आहे.महावीर बिराजदार, ट्रक चालक.