उंडाळे : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या खासगी वीज वितरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने कराड-चांदोली रोडच्या नांदगाव-काले दरम्यान नियम डावलून, मुजोरीने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी विजेचे खांब उभे करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे भविष्यात या राज्यमार्गावरून प्रवास करताना वाहनाचा चुकून अपघात झाला तर विद्युत वाहिनीच्या तारांना मोठा धोका संभवतो. त्यामुळे नियम डावलून मुजोरीने काम केलेल्या ठेकेदारावर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी विभागातील विविध पक्ष संघटना व जनतेतून होत आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून एका खाजगी कंपनीच्या वतीने कराड चांदोली रोडच्या हायब्रीड ॲन्यूईटी 38 अंतर्गत कराड, मलकापूर, नांदलापूर, पाचवड फाटा, येणपे, कोकरूड रस्ता राज्यमार्ग 144 च्या बाजूने विद्युत वाहिनीचे काम सुरू आहे. हे काम एका खाजगी कंपनीच्या वतीने ठेकेदार करत आहे.
या ठेकेदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजूने वीज वाहिनी व विद्युत पोल उभे करण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभाग या दोन्ही विभागाची रीतसर परवानगी घेऊन काम करण्याची आवश्यकता असताना या ठेकेदाराने मात्र या दोन्ही विभागांना बासणात गुंडाळून विद्युत वाहिनीचे जबरदस्तीने काम सुरू ठेवले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्याने आमच्याकडे विद्युत वाहिनी व विद्युत पोल उभे करण्यासाठी आवश्यक असणारी परवानगी घेतली नसल्याचे खाजगीत सांगितले. त्यामुळे या ठेकेदार कंपनी मुजोरीने व दांडगाईने काम करत असल्याचे चित्र आहे.
सार्वजनिक बांधकाम व रस्ते किंवा शासनाच्या सार्वजनिक ठिकाणी कोणीही काम करत असताना शासनाचे नियम आहेत. ते नियम पाळून संबंधित विभागाकडून कायदेशीर परवानगी घेऊनच कोणतेही काम करण्याचा शासन नियम आहे.
परंतु कराड-चादोली रोडच्या बाजूने काम करणाऱ्या व विद्युत वाहिनी व पोल उभे करणाऱ्या ठेकेदाराने नियम डावलून दांडगाईने काम सुरू ठेवले आहे. त्यामुळे भविष्यात जर काही अपघात घडला तर त्याला संबंधित ठेकेदार जबाबदार राहणार की? सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहणार? असे प्रश्न समाजमाध्यमावर उपस्थित होऊ लागले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतून काम करत असताना कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 17 ते 18 अटी व शर्ती आहेत. या सर्व शर्तीच्या अधीन राहून पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर संबंधित विभागाला लेखी देऊन परवानगी घेऊन शासनाच्या नियमानुसार कामकाज करावे, असा नियम आहे. परंतु या ठेकेदाराने अशी कोणत्याही परवानगी न घेता रस्त्याच्या दोन्ही बाजूने सार्वजनिक बांधकाम विभागाचे परवानगीशिवाय विद्युत पोल व तारा ओढण्याचे कामकाज सुरू ठेवले आहे. इतकेच काय पण या विद्युत वाहिनी टाकताना अडथळा करणारी मोठ-मोठी झाडे, त्यांच्या फांद्या तोडून संपूर्ण हिरवळीचा रस्ता ओसड केला आहे. यापूर्वी हिरवागार व वनराई नटलेला झाडांचा परिसर आता ठेकेदाराने बोडका केला आहे. इतकेच काय पण या झाडांच्या मोठमोठ्या फांद्या पाडताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे मोठे नुकसानही केले आहे.
भैरवनाथ नगर येथे झाडाच्या फांद्या रस्त्याच्या पुलाच्या संरक्षक पाईपवर पडल्याने पाईपांची मोडतोड झाली आहे. याची साधी दखल संबंधित ठेकेदाराने घेतली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विद्युत पोल मध्य रस्त्यापासून सात मीटर बाहेर उभे करावयाचा नियम आहे. परंतु ठेकेदाराने साईड पट्टी संपली की बाजूलाच विद्युत पोल उभे केले आहेत. त्यामुळे भविष्यात चुकून काही अपघात घडल्यास किंवा साईड पट्टीवरून एखादे वाहन विद्युत पोलवर आदळून अपघात घडल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. तेव्हा यास जबाबदार कोण राहणार ? सार्वजनिक बांधकाम विभाग की विद्युत वितरण विभाग? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नियम डावलून ठेकेदाराने काम करण्याचे धाडस केले आहे. हे काम कोणत्या नियमानुसार केले याची चौकशी होणे गरजेचे आहे. संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करून कामकाज थांबवून संबंधित ठेकेदाराला व कंपनीला काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.