कराड : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी गट, गण निहाय आरक्षण सोडत निघाल्याने निवडणुकीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. दिवाळीनंतर त्याला अधिक गती येईल. इच्छुकांची संख्या भरपूर असल्याने आणि काहींनी अपक्ष लढण्याची तयारी सुरू केल्याने निवडणूक चुरशीची व रंगतदार होणार आहे. उमेदवारी देताना आणि इच्छुकांना थांबविताना नेत्यांची कसोटी लागणार आहे.
कराड तालुका हा दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदार संघातात विभागला आहे.कराड तालुक्यात जिल्हा परिषदेचे 12 तर पंचायत समितीचे 24 गण आहेत. कराड तालुक्याच्या पंचायत समितीवर विलासराव पाटील-उंडाळकर गटाचे वर्चस्व राहिले आहे. सभापती, उपसभापती पदावर अनेकांना उंडाळकर यांनी संधी दिली आहे. मागील पंचायत समितीच्या निवडणुकीत उंडाळकर गटाशी माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जुळवून घेवून पंचायत समितीची सत्ता ताब्यात ठेवली होती. त्यावेळी डॉ. भोसले यांच्या सदस्यांना मात्र विरोधी बाकावर बसावे लागले होते.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारीवरुन बाळासाहेब पाटील आणि ॲड. उंडाळकर यांच्यामध्ये वितुष्ट आले. या निवडणुकीवेळी बाळासाहेब पाटील व डॉ.अतुलबाबा भोसले एकत्र आले. उंडाळकर गटाने बाळासाहेब पाटील गटाशी फारकत घेतली. बाजार समितीच्या निवडणुकीतही उंडाळकर विरोधात पाटील व भोसले गट एकत्र लढले. त्याच वेळी उत्तर मतदार संघात मात्र भाजपाचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ यांनी उंडाळकर गटाला साथ दिली. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक उंडाळकर गटाने जिंकली.
दरम्यान ॲड. उंडाळकर यांनी कार्यकर्त्यांना ताकद मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तर सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत आ.मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ यांनी प्रयत्न करुनही बाळासाहेब पाटील यांनी कारखान्याची सत्ता राखली. त्यामुळे राजकीय समिकरणे बदलली आहेत.
कराड दक्षिण व उत्तर मतदार संघात सर्व नेत्यांचे गट सक्रिय आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते अधिक सक्रीय झाले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीवर वर्चस्वासाठी नेत्यांनी ताकद पणाला लागणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बाळासाहेब पाटील व आ.डॉ.अतुलबाबा भोसले एकत्र राहून निवडणुकीत एकमेकांना मदत करतील अशी चर्चा आहे. कराड शहरात या दोन्ही नेत्यांची एकत्रित बॅनर इच्छुकांनी लावले आहेत. उंडाळकर व उत्तरेतील भाजप नेते यांची एकी कायम राहिली तर निवडणूक चुरशीच्या होणार हे नक्की. तरीही निवडणुका लढवण्याबाबत पक्षीय पातळीवर काय निर्णय होणार यावर राजकीय गणिते अवलंबून आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पक्ष पातळीवर लढली जाणार की आघाडीच्या माध्यमातून याबाबत अद्याप निर्णय झाला नसला तरी नेत्यांना मात्र स्थानिक पातळीवरील आपली ताकदी दाखविण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहेत.