सातारा : जिल्हा परिषदेच्या गट व पंचायत समिती गणांची सन 2011 च्या लोकसंख्येनुसार नव्याने रचना करण्यात येणार आहे. या रचनेकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून नव्या गट व गणाचा लाभ कोणाला होणार ? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ मार्च 2022 मध्ये संपला. त्यानंतर प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी सुत्रे हाती घेतली. दरम्यान राज्य शासनाने कायदा करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी निवडणूक पुढे ढकलली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी केली होती. त्यानुसार 10 मे 2022 रोजी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण प्रारूप रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला.
मात्र 28 एप्रिल 2022 रोजी प्रसिद्ध झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात सातारा जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 64 वरून 74 तर पंचायत समितीच्या गणांची 128 वरुन 148 निश्चित करण्यात आली. त्यामुळे 10 गटांची नव्याने रचना झाली होती. राज्य शासनाने 2011 च्या जनगणनेच्या आधारे आगामी निवडणुकीसाठी आता सदस्यांची संख्या निश्चित केली असल्याने आताच्या नव्या रचनेत जिल्हा परिषदेचे 65 आणि पंचायत समितीचे 130 गण आहेत. नव्या रचनेनुसार सातारा नगरपालिकेच्या हद्दवाढीमुळे सातारा तालुक्यातील शाहूपुरी, गोडोली हे दोन गट व चार गण कमी होणार आहेत. तर 2017 च्या फलटण, खटाव, व कोरेगाव तालुक्यातील प्रत्येकी एक गट, दोन गण वाढले आहेत. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार 14 जुलै रोजी जिल्ह्यातील नवीन गट व गणांची नावे समोर येणार आहेत. कोणती गावे कोणत्या गटात, गणात गेली आहेत.
तसेच नव्याने कोणते गट व गण अस्तित्वात येणार आहेत. यांची माहीती समजणार आहे. तसेच नव्या जिल्हापरिषद गट व पंचायत समिती गणाचा लाभ कोणाला होणार याकडे राजकीय पदाधिकार्यांचे डोळे लागले आहेत. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांचा बार उडणार असल्याने त्या दृष्टीने राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. गट व गणांची अंतीम रचना आयोगाकडून जाहीर झाल्यानंतर खर्या अर्थाने निवडणुकीला रंगत येणार आहे. इच्छुकांनीही सार्वजनिक कार्यक्रमातून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच गट गणांमध्ये विविध पक्षाकडून खात्रीशीर व प्रभावी उमेदवारांचा कानोसा काही राजकीय पदाधिकारी घेताना दिसत आहेत.